Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणुक लढवत 57 नगरसेवक निवडून आणले. भाजपला आता महापौर पद आणि सत्तेसाठी शिवसेनेच्या कुबड्यांची गरज भासणार नाहीये. असे असले तरी जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेसोबत युती करायला भाजपचे जिल्ह्यातील नेते आतूर होते. फारसे न ताणता भाजपने काही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नाराजी ओढावून घेत शिवसेनेसोबत युती केलीच. महापालिकेत युती तोडण्यावर भर देणाऱ्या भाजपने झेडपीसाठी नमते घेण्याचे नेमके कारण काय? हे आता समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 पैकी 6 आमदार हे शिवसेनेचे आहेत, तर भाजपचे तीन. ग्रामीण भागात शिवसेनेचा जोर आणि संघटनात्मक ताकद असल्यामुळेच युती करताना जास्त ताणू नका, अशा सूचना राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिल्या होत्या. त्यामुळे महापालिके प्रमाणे जास्त न ताणता तीन-चार बैठकांमध्येच काल शिवसेनेसोबतच्या युतीची घोषणा करण्यात आली.
मंत्री अतुल सावे यांनी युती झाल्याचे जाहीर केले. त्यानूसार भाजप 27 तर शिवसेना 25 जिल्हा परिषदेच्या गट व तेवढ्याच गणांमध्ये लढणार आहे. तरी या युतीत शिवसेनेचे सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांनी युतीत न लढण्याचा निर्णय घेत स्वबळावर दंड थोपटले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 63 पैकी 52 गटातच युती होऊ शकली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणले. पण शिवसेनेला मात्र युती तुटल्याचा मोठा फटका बसला. त्यांना 13 जागांवर समाधान मानावे लागले. शहरी भागात भाजपचा जोर अधिक दिसला. शहरात एक मंत्री, एक आमदार, एक खासदार अशी ताकद असल्याने स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला जुमानले नाही अन् युती तोडली. हा निर्णय योग्यही ठरला आणि भाजपने पहिल्यांदा शहरात मोठ्या भावाची भूमिका वठवली.
आत्मविश्वास बळावलेला भाजप जिल्हा परिषद निवडणुकीतही युती करणार नाही, अशी चर्चा कालपर्यंत होती. परंतु दोन-तीन बैठकीनंतर लगेच युती झाल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केले. भाजपने सावध पावित्रा घेत शिवसेनेपेक्षा दोन अधिकच्या जागा घेत झेडपीतही आम्हीच मोठे भाऊ असल्याची जाणीव शिवसेनेला करून दिली. परंतु जागा वाटप करताना शिवसेनेचे ग्रामीणमध्ये चार आमदार आणि भाजपचे फक्त दोन असल्याचे ध्यानात घेत शिवसेनेलाही योग्य सन्मान दिल्याचे दिसून आले.
जागा वाटप करताना गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतील संख्या बळाचाही विचार करण्यात आला. भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेचे ग्रामीणमध्ये चार आमदार असताना पक्षाच्या नेत्यांनीही महापालिकेचा अनुभव ताजा असल्यामुळे भाजप पेक्षा दोन जागा कमी म्हणजेच 25 गटातून लढवण्याची तयारी दर्शवली. या शिवाय शिवसेनेचे सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वबळावर आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच लढण्याची घोषणा केली आहे.
तसे पाहिले तर सत्तार यांच्या मतदारसंघातील 11 आणि युतीत सुटलेले 25 अशा एकूण 36 गटांवर शिंदेंची शिवसेना लढते आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सिल्लोड-सोयगावमधील अकरा गटात भाजपने मैत्रीपुर्ण लढत असेल, असे स्पष्ट केले आहे. अब्दुल सत्तार यांची ही खेळी जिल्हा परिषदेच्या निकालानंतर भाजपसाठी सत्ता स्थापनेच्या वेळी डोकेदुखी ठरू शकते. स्वबळावर लढणारे अब्दुल सत्तार हे आपल्याच पक्षालाही वेठीस धरू शकतात. त्यामुळे या अकरा जागांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील अशी सावध भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.