Ajit Pawar News : अजित पवारांच्या 'बारामती पॅटर्न' चा ढोल मराठवाड्यात वाजणार की फुटणार?
अजित पवारांनी बारामतीत राबवलेला विकास आणि संघटन मॉडेल मराठवाड्यात लागू करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे.
या मॉडेलमुळे स्थानिक नेतृत्व आणि पवार गटातील नातेसंबंधांवर मोठा प्रभाव पडू शकतो.
मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने विरोधी गटही सतर्क झाले आहेत.
Marathwada Local Body Election News : नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेगळी चूल मांडली आहे. काही भागात युती तर काही ठिकाणी स्वबळावर मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मराठवाडा दौरा सध्या चांगलाच गाजतो आहे.
नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये अजित पवारांनी घेतलेल्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. सुरवातीपासून विकासाच्या बाबतीत मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात अजित पवार हे बारामतीचा विकास पॅटर्न राबवू पाहत आहेत. आपल्या जाहीर सभांमधून बारामती, पिंपरी चिंचवड ही शहर आपण कशी वसवली आहेत याचा गवगवा अजित पवार आपल्या भाषणातून करताना दिसले. विशेषत: बीड जिल्हा दौऱ्यात त्यांनी बारामती पॅटर्न आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाचा ढोल अधिक जोराने बडावला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून आधी अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्हा राज्य पातळीवर बदनाम झाला. अजित पवार यांच्याच पक्षाचे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी थेट संबंध जोडला गेला आणि यातून त्यांना मंत्रिपद गमवावे लागले. दहशत, खून, बलात्कार, दरोडे अशा घटनांमुळे बदनाम झालेल्या बीडला रुळावर आणण्यासाठी अजित पवार यांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले.
अगदी पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपासून अजित पवारांनी बीडमध्ये यापूर्वी झालेल्या सगळ्या गैरप्रकारांना चाप लावण्यास सुरुवात केली. गेली कित्येक वर्ष ज्या धनंजय मुंडे यांच्या भरवशावर जिल्हा सोडला होता त्यांनाच दूर ठेवत अजित पवारांनी सगळी सूत्र आपल्या हाती घेतली. बीड नगर पालिकेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या योगेश क्षीरसागर व त्यांच्या घराण्यावर अजित पवारांनी कालच्या सभेतून हल्ला चढवला.
यावेळी केलेल्या भाषणात अजित पवारांनी बारामती आणि पिंपरी चिंचवडमध्ये विकास कामे केल्याचा दावा करत मी आधी करतो आणि मग बोलतो, अशा शब्दात विरोधकांना ठणकावले. 35 वर्षात बीड शहराची क्षीरसागर कुटुंबाने वाट लावल्याचा आरोप करत पाच वर्ष माझ्या हातात सत्ता द्या, जे 35 वर्षात झाले नाही ते मी तुम्हाला पाच वर्षांत करून दाखवतो, असा वादा अजितदादांनी यावेळी केला.
नांदेड, परभणी, जिंतूर या शहरातही अजित पवारांनी बारामतीच्या विकास पॅटर्नचा गवगवा करत मतदारांना साद घातली. आता अजित पवारांच्या या हाकेला मराठवाड्यातील मतदार कसा प्रतिसाद देतात? हे तीन तारखेच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांच्याकडून जरी बारामती पॅटर्न आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचा दावा केला जात असला तरी त्यांच्या या दाव्यावर भाजपाकडून टीका होत आहे. जिंतूरच्या सभेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना उद्देशून टीका झाल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या बारामती पॅटर्न वर टीका केली.
मग तेव्हा विकास का केला नाही?
सत्तेचे केंद्र कायम बारामतीमधून हलत असल्यामुळे आणि अजित पवार राज्याचे दीर्घकाळ अर्थमंत्री राहिल्यामुळे जिथे बारामतीला दहा रुपये आवश्यक होते तिथे शंभर रुपयांचा निधी दिला गेला. मग बारामतीचा विकास कसा होणार नाही? असा सवाल बोर्डीकरांनी केला. आता बारामती पॅटर्न आणि पिंपरी चिंचवड विकासाचा दावा करणाऱ्या अजित पवारांनी जिंतूर शहरांमध्ये नगरपालिकेत त्यांच्या पक्षाची सत्ता असताना निधी का दिला नाही? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांच्या बारामती पॅटर्नवर त्यांनी टीका केली.
अजित पवार यांचा वक्तशीरपणा, कामाची धडाडी याचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक प्रभाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडण्याआधी मराठवाड्यात अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग होता. पक्षफुटी नंतर मध्यंतरीच्या काळात अनेक जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी शरद पवारांसोबत जाणे पसंत केले होते. मात्र महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याच्या अजित पवारांच्या निर्णयानंतर मराठवाड्यातील हे चित्र पालटले. पक्ष वाढीसाठी अजित पवारांनीही वारंवार या भागाचे दौरे करत पकड मिळवली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसची मराठवाड्यात ताकद वाढली की घटली? हे स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांनी बारामती पॅटर्न आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाचा दाखला देत मतदारांना केलेले आवाहन ते कितपत स्वीकारतात? यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यश अवलंबून असणार आहे.
5 FAQs (Marathi)
1. अजित पवारांचा बारामती मॉडेल म्हणजे काय?
विकासाभिमुख प्रकल्प, संघटनात्मक सुसूत्रता आणि केंद्रित नेतृत्व व्यवस्थापन हे या मॉडेलची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
2. हे मॉडेल मराठवाड्यात का चर्चा होत आहे?
पवार गट मराठवाड्यात आपले प्रभावक्षेत्र वाढवू इच्छित असल्याची राजकीय चर्चेमुळे हे मॉडेल चर्चेत आले आहे.
3. स्थानिक नेते या मॉडेलला कसा प्रतिसाद देत आहेत?
काही नेते सहमत आहेत, तर काहींना केंद्रित नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करताना दिसते.
4. याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
मतदार आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीवर याचा मोठा प्रभाव पडू शकतो.
5. हे मॉडेल यशस्वी होण्याची शक्यता किती?
स्थानिक परिस्थिती, नेतृत्व मान्यता आणि संघटनात्मक ताकद यावर हे पूर्णपणे अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
