वाल्मिक कराड यांच्या मुद्द्याने धनंजय मुंडे यांच्या राजकीय गणितात पुन्हा एकदा अडथळा निर्माण होण्याची चर्चा सुरू आहे.
अजित पवार आणि पंकजा मुंडे दोघेही या प्रकरणावर सावध भूमिका घेत असल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कराड-मुंडे समीकरण पुन्हा उग्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Beed Politics : धनंजय मुंडे यांनी परळी नगर पालिकेच्या प्रचार सभेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांना हा उल्लेख केला. परळी नगर परिषदेच्या सत्तेसाठी वाल्मिक कराड याच्या समर्थकांना चुचकारण्याचा मुद्दाम केलेला प्रयत्न होता, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. वाल्मिकची काढलेली ही आठवण धनंजय मुंडे यांना परळी नगर परिषदेची सत्ताही कदाचित मिळवून देईल, परंतु बीड जिल्हा आणि मराठवाड्यात याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसू शकतो.
गोपीनाथ गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात जेव्हा वाल्मिक कराडचे समर्थन करणारे पोस्टर झळकवत त्याच्या समर्थकांनी गोंधळ घातला तेव्हा पंकजा मुंडे कमालीच्या संतापल्या होत्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या अमानूष हत्येने संपूर्ण राज्यात बीडची बदनामी झाली. मराठा विरुद्ध वंजारी, ओबीसी असा रंगही या प्रकरणाला दिला गेला. ज्याची किंमत धनंजय मुंडे यांना आपले मंत्रीपद गमावून चुकवावी लागली. पंकजा मुंडे यांनाही याचे चटके काही प्रमाणात जाणवले. परंतु नगर पालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे वाल्मिक कराडची उणीव भासत असल्याचे सांगत नवा वाद ओढावून घेतला.
धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर पंकजा मुंडे यांनी संयमित मार्गदर्शन करत वादग्रस्त मुद्यांना अजितबात थारा दिला नाही. धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे वाल्मिक कराड याचा केलेला उल्लेखही त्यांना पटला नसावा. आता याचे नेमके परिणाम काय होतात? हे निवडणूक निकालानंतर दिसून येणार आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठू लागली आहे.
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळके, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंडेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे याने जर वाल्मिक कराडची आठवण काढली असेल तर त्याचा सारखा नीच माणूस या पृथ्वीतलावर दुसरा कोणी नसेल? अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता तरी कारवाई करा, असे आवाहन केले होते.
त्यांच्यासोबत जाऊन बसा..
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची उणीव भासत असेल तर त्यांना भेटायला जा, असे म्हणत टोला लगावला. तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या बाजूला जाऊन बसावे, अशा शब्दात राग व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
अजित पवारांनी राखले अंतर..
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे दोन दिवसापासून मराठवाडा दौऱ्यावर होते. नांदेड, परभणी, बीडमध्ये त्यांच्या अनेक ठिकाणी प्रचार सभाही झाल्या. पण या सगळ्या दौऱ्यात वाल्मिक कराडची आठवण काढणाऱ्या आपल्या पक्षाचे आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांना दूर ठेवल्याचे दिसून आले. आधीच वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी बदनामी झाली. धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचा आरोपही अजित पवारांवर झाला होता. आता निवडणुकीच्या काळातच वाल्मिक कराडची आठवण काढत धनंजय मुंडे यांनी पक्षाची आणि अजित पवार यांची डोकेदुखी वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुंडे यांना दूर ठेवण्याचे धोरण आखले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या आणि यातील मुख्य आरोपींवर बीडच्या विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्या दरम्यान अनेकदा वाल्मिक समर्थकांनी रस्त्यावर उतरत बॅनरबाजी, घोषणाबाजी केल्याची अनेक उदाहरणं आहेत. विशेषतः जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आणि आंदोलनाचा भडका उडाला तेव्हा प्रकर्षाने वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर आणि समाज माध्यमांवरही सक्रीय होते. धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे परळीत वाल्मिकची आठवण काढल्यानंतर आता त्याचे समर्थक पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
1. वाल्मिक कराड मुद्दा पुन्हा चर्चेत का आला?
धनंजय मुंडेंविरुद्धच्या पूर्वीच्या वादामुळे कराडांची आठवण पुन्हा राजकीय चर्चेत आली आहे.
2. यामुळे धनंजय मुंडेंना काय धोका आहे?
स्थानिक नाराजी, प्रतिमा आणि गटबाजी वाढल्यास त्यांच्या मतदारसंघातील समीकरणे बिघडू शकतात.
3. अजित पवार अंतर का ठेवत आहेत?
पक्षातील तणाव वाढू नये आणि स्थानिक वादात अडकू नये म्हणून ते सावध भूमिका घेत आहेत.
4. पंकजा मुंडेंची या प्रकरणावर भूमिका काय?
त्या थेट प्रतिक्रिया देत नाहीत, पण अंतर्गत बैठकीत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
5. कराड मुद्द्याचा आगामी निवडणुकांवर परिणाम होईल का?
होय, बीड आणि मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.