
Incomtax Notice News : विधानसभेच्या 2019 आणि 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत शपथपत्रात दाखवलेली तुमची संपत्ती एवढी वाढली कशी? अशी विचारणा मला आयकर विभागाकडून करण्यात आल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. पैसे कमावणे सोपे, पण ते सांभाळणे आणि खर्च कसे करायचे हे ठरवणे अवघड असल्याचे सांगत शिरसाट यांनी स्वतःच आपल्या आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली एका जाहीर कार्यक्रमात दिली होती.
या नोटीसीला 9 जुलै रोजी आपल्याला उत्तर देण्यास सांगण्यात आले होते, असेही शिरसाट यांनी सांगितले आहे. मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे सध्या अनेक वादांमुळे चर्चेत आहेत. मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर विवाहित महिलेने केलेले आरोप, हाॅटेल व्हिट्स खरेदी प्रकरण, एमआयडीसीतील प्लाॅट, शहरालगत सरकारी वर्ग दोनची जमीन कुटुंबियांच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप तसेच शहर आणि परिसरात पंधरा एकर जमीन आणि प्लाॅट खरेदी केल्याचा आरोपांमुळे शिरसाटांची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मागणीवरून संजय शिरसाट यांच्याशी संबंधित हाॅटेल व्हिट्स खरेदी-विक्री प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी जाहीर केली आहे. (Incom Tax) हा धक्का बसत नाही तोच आयकर विभागानेही शिरसाट यांना नोटीस पाठवल्याने त्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीसीमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संपत्ती बाबत दाखल केलेले शपथपत्र आणि 2024 मधील शपथपत्रामधील संपत्तीत झालेली वाढ कशी झाली? याची विचारणा करण्यात आली आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गेल्या महिन्यात संजय शिरसाट यांच्या बेकायदा मालमत्ता खेरदीची प्रकरण बाहेर काढत त्याचे कागदोपत्री पुरावे माध्यमांना दिले होते. त्यानंतर याच प्रकरणात त्यांनी ईडी, इनकम टॅक्स, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडेही लेखी तक्रार देत संजय शिरसाट यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर संजय शिरसाट यांना इनकम टॅक्स विभागाची नोटीस आल्याने इम्तियाज यांच्या तक्रारीवर ही कारवाई झाली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी आपल्याला आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली दिली आहे. यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, हे वक्तव्य माझ्यासाठीच असल्याचे शिरसाट म्हणाले होते. पैसे कमावणे सोपं आहे. मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचे ही ते म्हणाले. सत्ताधारी मंत्र्यालाच आयकर विभागाची नोटीस आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.