

MPSC News Maharashtra: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान मिळवू न शकलेल्या गुणवंत उमेदवारांसाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी ‘निपुण सेतू’ उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग विभागाच्या मैत्री 2.0 (MAITRI 2.0) पोर्टलअंतर्गत हा उपक्रम राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, MPSCच्या कोणत्याही परीक्षेत मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा इतर अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या, मात्र अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांची माहिती ‘निपुण सेतू’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे अशा उमेदवारांच्या ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग राज्यातील उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र आणि विविध संस्थांना करता येणार आहे. शासन निर्णयानुसार हा उपक्रम यापुढे MPSCमार्फत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू राहणार आहे. तसेच मागील एका वर्षात झालेल्या परीक्षांमधील अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या उमेदवारांची माहितीही त्यांच्या संमतीने पोर्टलवर समाविष्ट केली जाऊ शकते.
उमेदवारांची कोणती माहिती उपलब्ध होणार?
‘निपुण सेतू’ पोर्टलवर उमेदवारांचे नाव, जन्मवर्ष, शैक्षणिक पात्रता, विशेष प्राविण्य, पूर्वानुभव, संबंधित परीक्षेतील गुण तसेच संपर्क तपशील उपलब्ध राहतील. मात्र संपर्क माहिती केवळ अधिकृत आणि पडताळणी झालेल्या नियोक्त्यांनाच दिसणार आहे.
API द्वारे थेट डेटा हस्तांतरण
MPSCकडून प्रत्येक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या पण निवड न झालेल्या उमेदवारांचा डेटा API प्रणालीद्वारे सुरक्षितपणे ‘निपुण सेतू’ पोर्टलवर हस्तांतरित केला जाणार आहे. उमेदवाराची पुढील एखाद्या परीक्षेत निवड झाल्यानंतर त्याची माहिती पोर्टलवरून आपोआप वगळली जाईल.
गोपनीयतेवर भर
या उपक्रमासाठी उमेदवारांची डिजिटल संमती (Digital Consent) घेणे बंधनकारक राहणार आहे. उमेदवारांची माहिती केवळ नोंदणीकृत आणि पडताळणी झालेल्या उद्योग, संस्था, महामंडळे तसेच शासकीय आणि निमशासकीय संस्थांनाच रोजगाराच्या उद्देशाने पाहता येणार आहे. डेटा सुरक्षेसाठी एन्क्रिप्शन आणि अॅक्सेस कंट्रोलसारख्या तांत्रिक उपाययोजनांचा वापर केला जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
दोन महिन्यांत पोर्टल कार्यान्वित
शासन निर्णयानुसार ‘मैत्री 2.0’ अंतर्गत ‘निपुण सेतू’ पोर्टल विकसित करून पुढील दोन महिन्यांत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय नियंत्रण समितीही स्थापन करण्यात येणार असून ती त्रैमासिक आढावा घेणार आहे.
मात्र, शासनाने स्पष्ट केले आहे की ‘मैत्री’ पोर्टल केवळ समन्वयकाची भूमिका बजावेल. उमेदवारांना नोकरी मिळण्याची कायदेशीर हमी सरकार किंवा MPSC देणार नाही. नोकरीचे स्वरूप, वेतन आणि सेवा अटी या संबंधित नियोक्ता आणि उमेदवार यांच्यातील परस्पर करारावर अवलंबून असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.