
MSRTC regional restructure : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं विकेंद्रीकरण होणार आहे. परिवहन खात्याचे शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसा निर्णय घेतला आहे. कर्नाटक परिवहन मंडळाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार योग्य व्यवस्थापन आणि निर्णयाच्या विकेंद्रीकरणाच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री सरनाईक हे कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील महामंडळाच्या विकेंद्रीकरणाचा अभ्यास केला. यानंतर त्यांनी ही संकल्पना उचलून धरली. त्यामुळे आकार व प्रशासकीयदृष्ट्या कर्नाटक महामंडळाच्या दुप्पट असणाऱ्या महाराष्ट्र (Maharashtra) एसटी महामंडळाचे देखील किमान पाच प्रादेशिक विभागांत विभाजन करावे, अशी संकल्पना त्यांनी मांडली.
स्थानिक पातळीवर वाहतुकीचे नियोजन करणे, यात्रा-जत्रा यांसाठी जादा वाहतूक यांसारख्या निर्णयासाठी विलंब होत होते. प्रशासकीय दिरंगाईमुळे त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या महसुलावर होत होता. या सर्वांची दखल घेऊन ‘नियंत्रण नियोजन आणि समन्वया’च्या हेतूने एसटी महामंडळांतर्गत पाच प्रादेशिक विभाग करण्यात आल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एसटी महामंडळाच्या नियोजन व पणन खातेअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संनियंत्रण समित्यांचे कार्यालय 6 डिसेंबर 2016 पासून बंद करण्यात आले होते. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अंमलबजावणीचे पत्रक काढले असून लवकरच या प्रादेशिक विभागांची स्वतंत्र कार्यालये सुरू होणार आहेत.
राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या धर्तीवर एसटीची यंत्रणा उभी आहे. तालुकास्तरावर आगार जिल्हास्तरावर विभागीय कार्यालय आणि राज्य स्तरावर मध्यवर्ती कार्यालय, अशी त्रिस्तरीय रचना सध्या कार्यरत आहे.
महसूल विभागाप्रमाणे सहा प्रशासकीय विभागांचा या त्रिस्तरीय रचनेत समावेश नव्हता. त्यामुळे मध्यवर्ती कार्यालयातून थेट विभागीय कार्यालयाशी संवाद साधणे भौगोलिकदृष्ट्या अडचणीचे ठरत होते. या विभागांसाठी पुरेशा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे आणि अमरावती, असे पाच प्रादेशिक विभाग असणार आहेत. प्रत्येक प्रादेशिक विभागांतर्गत कार्यरत विभाग आणि मुख्यालय, असे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.