Marathwada Political News : राज्यातील सत्ताधारी भाजप आणि विरोधक ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र काही केल्या थांबत नाहीये. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजपचा कुणीतरी नेता प्रत्युत्तर देतांना दिसत आहे. भाजपचे आमदार व मुंबईतील नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या संदर्भाने उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेवर `लबाड लांडगा`, असे म्हणत टीका केली आहे.
आधीच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी लावून धरत (BJP) भाजपने ठाकरे गटाला डिवचण्याचे काम सुरू केले आहे. आता महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत ठाकरे गटावर रोज नवनवे आरोप भाजपकडून केले जात आहेत. त्यात आशिष शेलार (Ashish Shelar) आघाडीवर आहेत. तर त्यांना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जशास तसे उत्तर देतांना दिसत आहेत.
शेलार यांच्या ट्विटचा समाचार घेताना दानवे यांनी `मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतोय`, अशा शब्दात भाजपला सुनावले आहे. काय तो साक्षात्कार आशिष शेलार तुमचा! शिवसेना (Shivsena) मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का? सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो आहेच! ज्या प्रकारे मुंबईकरांच्या ठेवी 'उडवल्या' जात आहेत त्यावरून मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही`, असे म्हणत दानवे यांनी शेलारांच्या टीकेचा समाचार घेतला.
काय म्हणाले होते शेलार..
मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या कारभारावर टीका करतांना शेलार यांनी पंचवीस वर्षांचा पाढाच वाचला. गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले, मुंबईची तुंबई झाली, अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले. २६ जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली, झाड पडून काहीजण गेले, संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले.
तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा ! आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका! मुंबईकर हो! म्हणून आम्ही वारंवार सांगतोय लबाड लांडगा ढोंग करतोय मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय, अशी टीका आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून केली आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.