Mahapalika Nivadnuk 2026: कोणाचे पतंग उंच जाणार, कोणाचे कापले जाणार?

Maharashtra municipal election 2026 Mahayuti vs Mahavikas Aghadi: यंदा मकर संक्रातीचे म्हणजेच संक्रमणाचे वेध लागलेले असताना राज्यातील महापालिकांत राजकीय संक्रमणही होत आहे. या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला संक्रांत येत असे. सत्तेचे हे संक्रमण होत असताना आरोप-प्रत्यारोपांची पतंगबाजी रंगू लागली आहे. कोणाचे पतंग उंच जाणार, कोणाचे कापले जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Mahayuti vs Mahavikas Aghadi
Maharashtra municipal election 2026 Mahayuti vs Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

अभय नरहर जोशी

कारभारी देवाभाऊ : मले तर बम्म मजा येऊन राहिली...आमचा पतंग पहा कसा उंच चाललाय...अनेकांचे पतंग आम्ही संक्रांतीआधीच कापलेत. काही जणांवर तर ‘संक्रांत’च आणल्यानं ते घरातच बसलेत. आता आम्ही आमचे पतंग काही शहरांत मित्रांसमवेत तर, काही शहरांत मित्रांविना अन् काही ठिकाणी तर मित्रांच्या विरोधातच उडवत आहोत...

दाढीवाले ठाणेकर : हे पहा आमची गतिमान ‘पतंगबाजी’ आहे. गरिबांना ‘पतंगबाजी’चा आनंद आम्ही देतो. संक्रांतीनिमित्त ‘लाडक्या बहिणीं’ना वाण लुटण्यास माझ्या परीने मदत करतच आहे. ठाणे-पुणे-नाशिक सर्वत्र आमचा पतंग उंच जाईल. आमचे सच्चे सैनिकच वाघाप्रमाणे काम करून आमचे पतंग उंच नेतील. बाकी नुसत्या ‘वावड्या’ उठवतील.

‘मातोश्री’वाले : फसवून पतंगबाजी करता. आमच्या काही जणांना तुम्ही पतंग संक्रांतीआधीच आखडून घ्यायला लावलेत. काटाकाटीची मजाच नाही. असल्या ‘बिनविरोध’ पतंगबाजीनं या संक्रांतीला काय अर्थ राहिला. हे संक्रमण नाही तर हे आक्रमण आहे... ही दडपशाही आहे...ही गद्दारी आहे...गुजरातमध्ये चालत असेल अशी पतंगबाजी...महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही...

‘रेल्वेइंजिन’वाले : बरं का...हे पतंग आखडून घ्यायला वगैरे लावणे शुद्ध नालायकपणा आहे. पतंगबाजी करताना विरोधात कुणी तरी हवंच नाही. तुम्हालाच सगळं मोकळं आकाश कसं द्यायचं? ते काही नाही. यंदा दादासह आम्ही दोघे पतंग उडवू. मी त्याला ढील देण्यासाठी भरपूर मांजा उपलब्ध करून देईन...

‘भोंगेवाले’ संपादक : मी भोंगे लावून या पतंगबाजीत आमच्या मशाल चित्राचा पतंग अन् रेल्वेइंजिन चित्राचा पतंग उंच उंच जाण्यासाठी प्रोत्साहन देईन.

‘बारामतीकर’ मोठे साहेब : ठिकठिकाणी सोय पाहून, आकाश पाहून, वारा कोणत्या दिशेनं वाहतोय ते पाहून आम्ही पतंग उडवू. जिथं उडेल तिथं उडेल. नाही तर शक्यतो दुसऱ्याचे कटलेले पतंग हाती लागतात का ते पाहून निकाल घेऊ...

‘बारामतीकर’ दादासाहेब : आम्हाला जे पायजेलाय ते ‘कमळा’बाई देईनाशी झाली. आमच्या वाट्याला पुरेसे पतंग नाहीत. आम्हाला ते उडवायला नीट गच्चीही उपलब्ध करून देईनात. मग आम्ही जमेल तिथे, जमेल तितके भिडू जमवून उडवतोय आमचे पतंग. मुंबईत आमचा ‘नवाब’ भिडू ‘कमळा’बाईला पसंत नव्हता. नाय तर नाय. आपल्याला काय...आम्ही आमचे पतंग उडवणार. तुम्ही तुमचे पतंग उडवा. फुडचं फुडं पाहूू रोजची ‘पहाट’ वेगळी...

Mahayuti vs Mahavikas Aghadi
PCMC Nivadnuk: राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या घरावर दगडफेक! भाजप कार्यकर्त्यांवर संशय

‘पंजेवाले’ प्रदेशाध्यक्ष : पूर्वी मोठ मोठे पतंग आम्ही उंच उंच उडवलेत. त्यातले काही पतंग आता ‘ढगात’च गेलेत. आता आमची इच्छा आहे पण कोणी आमच्याबरोबर पतंग उडवायलाच येत नाही. पतंगही लवकर मिळत नाहीत. माझी अवस्था तर ‘शोले’तल्या जेलर असरानीसारखी झालीये. अर्धे एकीकडे तर अर्धे दुसरीकडे गेलेत. माझ्या मागंच कुणी नाही...काही ‘वंचित’ मित्र धावून आलेत. बघू उडला तर उडला पतंग. नाय तर पतंग कटण्याची आम्हाला सवयच झालीये...

कारभारी देवाभाऊ (खुदूखुदू हसत) : तुमच्या पतंगांसाठी ‘वाचूननामा’चा कागद वापरा, नाही तर पतंगबाजीसाठी ‘नाचून’नामा वापरा. आमचा ‘कमळ’ चित्राचा हा पतंग उत्तुंग जाणार. त्यासाठी आम्ही निष्ठावंत ‘सैनिक’ही कामाला लावलेत. ते आपल्या ‘धनुष्य-बाणा’ने तुमचे पतंग काटून टाकणार बघा...

‘बारामतीकर’ दादासाहेब : एक मिनिट...अहो, तुम्ही सगळ्यांचेच पतंग कापत निघालात. आम्ही साथ दिली तरी तुम्ही आमचेही पतंग कापत आहात. किती राक्षसी महत्त्वाकांक्षा तुमची. थोडं तरी आम्हाला आकाश मोकळं ठेवा.

शेलारमामा मुंबईकर : आलात तर तुमच्याबरोबर, नाय तर तुम्हाला सोडून अन् विरोध केलात तर तुमचा पतंग कापून आमचा पतंग उंच उडवणारच...

कारभारी देवाभाऊ (स्मितहास्य करत) : ‘शरीफ हैं हम, किसी से लड़ते नहीं, पर जमाना जानता है, किसी के बाप से डरते नहीं’ दादासाब...जिन के घर शिशे के होते है वो दुसरोंपर पत्थर नहीं फेका करते...

‘रेल्वेइंजिन’वाले (छद्मीपणे हसत) : फार हिंदी-ऊर्दू नको बरं का. मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात मराठीच चालणार. आमच्याकडे फार व्हिडिओ आहेत बरं का तुमच्या ‘ऊर्दू’ अन् ‘ऊर्दूवाल्यां’च्या प्रेमाचे...ते लावू आम्ही मग तुमचे पतंग बाराच्या भावात कटतील...

कारभारी देवाभाऊ (खुदूखुदू हसत) : आता तुम्हाला मराठी आठवते का? आमचीच पतंगबाजी खरी भगवी अन् मराठी आहे. या संक्रातीला गोड बोलणं शक्य नाही. संक्रांतीनंतर एकदा तुमच्यावर खरी ‘संक्रांत’ आली की मग नेहमीप्रमाणेच आपण सर्व तीळ-गूळ घेऊ नि गोड गोड बोलू बरं का...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com