Maharashtra Politics : राज्यात गेल्या महिन्याभरात दोन वेळा एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. आता आणखी मोठे धक्के उद्धव ठाकरे यांना बसतील, असा दावा सत्ताधारी शिवसेनेकडून केला जात आहे. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल देखील विविध तर्क-वितर्क लावले जात असून, त्यांचे खासदारही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीत जातील, ते सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा केला जातोय.
राष्ट्रवादीबाबत सुरू असलेल्या चर्चा आता थांबल्या असतानाच खासदार अमोल कोल्हे यांनी मात्र थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी, 'ऑफर आली तर विचार करेन,' असे वक्तव्य केले आहे. यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, नुकताच उद्धव ठाकरे यांच्या काही खासदारांनी वेगळी भूमिका घेत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदारही सत्ताधारी राष्ट्रवादीत जातील, पक्षांतर करू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या चर्चा फेटाळून लावत, आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नसल्याचे सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार कोल्हे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी, महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू, असे वक्तव्य केले. यावरून आता नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी कोल्हे म्हणाले, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ आराखड्यानुसार मार्गी लागत असेल आणि त्यासाठी महायुतीकडून कोणती ऑफर आली, तर आपण विचार करू.
तसेच, "आपण विचार करेन" असे म्हटले असून, "आपण जाणार" असे म्हटलेले नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच आपण पक्षांतराचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नसून, विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे ऑपरेशन टायगरनंतर आता ‘ऑपरेशन तुतारी’चे संकेत मिळत असून, राजकीय हालचालींना पुन्हा वेग आल्याचे दिसत आहे.
यावेळी कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करत म्हटले की, "दिल्लीत अनेक नेत्यांची नावे घेतली जातात. त्याच नजरेतून नेत्यांकडे पाहिले जाते. पण एखाद्या मराठी माणसाचे, नेत्याचे नाव ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून समोर येत असेल, तर ती बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. जसे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देशभर आदराने घेतले जाते, तसेच देवेंद्र फडणवीस यांचेही नाव पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घेतले जात असेल, तर त्यात चुकीचे काहीच नाही. मी ही भूमिका राजकीय भूमिका बाजूला ठेवून महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून व्यक्त करत आहे."
दरम्यान, ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर भविष्यात शरद पवार यांचे खासदारही पक्षांतर करू शकतात, असा दावा केला जात आहे. यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "पवार साहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण, हीच आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे. माध्यमांमध्ये सध्या सुरू असलेल्या चर्चा या वावड्या असतील. त्यांना फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही. याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे त्यावर आपण भाष्य करणे योग्य ठरणार नाही." असे म्हणत त्यांनी खासदार फुटीचा प्रश्नच उरत नाही, असेही स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.