Mangalvedha Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडताना वरिष्ठ नेत्यांनी मंगळवेढ्यातील स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचा ठपका ठेवत मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीत बंड झाले. त्यामध्ये अनेकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. आता हाच नाराज झालेला गट सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या गळाला लागल्याने आगामी काळात या गटाची भूमिका तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे.
अजित पवार यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून फारकत घेत सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटात सहभागी होत उपमुख्यमंत्रिपद मिळवले. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्याचा दौरा करताना मतदारसंघ पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मागील आठवड्यामध्ये मंगळवेढा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला. मात्र, सत्काराच्या निमित्ताने तीन ठिकाणी वेगवेगळे सत्कार झाल्यामुळे अजून राष्ट्रवादीतील गटबाजी संपली नसल्याचे दिसून आले असले तरी पदाधिकारी निवडीवरून नाराज झालेल्या राष्ट्रवादीचा गट मात्र त्यावेळी अलगद बाजूला होता.
आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेता शहरांमध्ये आपले राजकीय बस्तान मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने बुधवारी नाराज गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची भेट घेत शहरातील लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या महापुरुषाच्या पुतळ्यांच्या कामाची माहिती देत त्यांच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्याबाबत शब्द घेतला.
याचबरोबर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची जाणीव उपमुख्यमंत्र्यांना करून देताना तालुक्यातील राजकीय परिस्थितीची देखील जाणीव करून दिली. त्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे,बशीर बागवान, ज्ञानेश्वर भगरे,पांडुरंग ताड,प्रकाश गायकवाड,राहूल सावंजी,सोमनाथ बुरजे,संभाजी घुले,आदी यावेळी उपस्थित होते.
लतिफ तांबोळी व रामेश्वर मासाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे यापूर्वीच समर्थन केले. परंतू, त्यांना कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत पाठबळ दिले नव्हते. त्यामुळे अजित पवार यांचा गट मंगळवेढ्यात कमकुवत होता. पण आजच्या बैठकीत राष्ट्रवादी(NCP) च्या नाराज गटाने उपस्थिती लावली.
हा गट अजित पवारांच्या गटाला मिळाल्यास त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसू शकतील. त्यामुळे हा नाराज गट आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्तेचा लाभ घेत शहरांमध्ये व तालुक्याच्या विकासामध्ये कोट्यवधीचा निधी उपलब्ध करू शकेल अशी परिस्थिती आजमितीला आहे. त्यामुळे आगामी काळात हा गट विधानसभा निवडणुकीत कोणाला समर्थन करणार हे देखील पाहणे निर्णायक ठरणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.