शिर्डी ( अहमदनगर ) - राज्यात शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने महाविकास आघाडीच्या हातून सत्ता गेली. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले खासदार सदाशिव लोखंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत आव्हान देण्यासाठी नाशिकचे फायरब्रँड नेते बबनराव घोलप यांना मैदानात उतरविण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. तसे स्पष्ट संकेत काल (शनिवारी) युवा नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्या शिर्डी दौऱ्यात मिळाले. ( Aditya Thackeray's visit hints at Gholpa's candidacy against Lokhande )
घोलप हे दहा वर्षांपूर्वीच येथून शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा येथे आणून यंत्रणादेखील सक्रिय केली होती. मात्र, न्यायालयाच्या निकालामुळे त्यांना ऐन वेळी माघार घ्यावी लागली. आता कुठलीही कायदेविषयक अडचण नसल्याने ते येथून पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतील. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना विचारले असता ते म्हणाले, की घोलप यांच्यासमोर कुठलीही कायदेविषयक अडचण नाही.
आज सुरवातीपासूनच घोलप हे ठाकरे यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते. नेवाशाहून शिर्डीकडे परतताना त्यांच्या वाहनाचे टायर फुटल्याने वाहन नादुरुस्त झाले. त्यामुळे ते काहीसे उशिरा सभास्थळी आले. त्यांना पाहताच शिवसैनिकांनी जल्लोष आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ठाकरे यांनी त्यांना व्यासपीठावर बोलावून स्वतःजवळ उभे केले. एवढेच नाही, तर तिकीटवाटप माझ्या हाती नाही, अशी मिस्कील टिप्पणीदेखील केली.
शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडे यांच्या विरोधात घोलप यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरविण्याचे शिवसेनेने ठरविले आहे. त्यांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. मतदारसंघात बांधणी करण्यासाठी अद्याप दोन-अडीच वर्षांचा कालावधी आहे. घोलप यांच्याकडे निवडणुका लढविण्याचा प्रदीर्घ अनुभव आणि यंत्रणा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच त्यांचे दौरे सुरू होतील.
गद्दारांना हरवून भगवा फडकवा
पाच वर्षे शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे कधी दिसले नाहीत. मागील निवडणुकीत मी त्यांच्यासाठी सभा घेतल्या. एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी जनतेची माफीदेखील मागितली. जनतेनेही माफ केले आणि त्यांना पुन्हा निवडून दिले. मात्र, त्यांनी गद्दारी केली. गद्दारांना धडा शिकवा आणि शिर्डीत भगवा फडकवा, असे आवाहन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सभेस उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना केले. यावेळी शिवसैनिकांनी गद्दारांना माफी नाही, अशा घोषणा देत त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.