

Karad, 29 October : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, याचे प्रत्यंतर कऱ्हाड तालुक्यात येत आहे. सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार आनंदराव पाटील, कऱ्हाड सोसायटी गटाचे उमेदवार ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे पहिल्यांदाच अनेक वर्षांचे राजकीय वैर विसरून एकाच व्यासपीठावर एकत्र आले. एवढेच नव्हे तर व्यासपीठावर दिलखुलास गप्पांमध्येही रंगल्याचे उपस्थितांनी पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील-वाठारकरही त्यांच्यासमवेत होते. उंडाळकर गटाने आयोजित केलेल्या जिल्हा बॅंकेच्या मेळाव्याला माजी आमदार पाटील यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.
माजी केंद्रीय मंत्री (स्व.) आनंदराव पाटील, (स्व.) प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यापासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असेपर्यंत माजी आमदार आनंदराव पाटील यांचे राजकीय सूत माजी मंत्री (स्व.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याशी कधीच जुळले नाही. मात्र, काळाच्या ओघात पुलाखालून बरेच पाणी गेले. त्यानंतर राजकीय वैर विसरून विलासकाकांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन दोन्ही गट एकत्र आले. त्यावेळी तालुक्यात एक वेगळी लाट तयार झाली होती.
त्यादरम्यान माजी आमदार पाटील यांनी चव्हाण गटापासून फारकत घेतली. त्यानंतर ते भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत गेले. त्यामुळे उंडाळकर गट आणि माजी आमदार पाटील यांचे राजकीय शत्रुत्व कायम राहिले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीलाही ते उंडाळकरांच्या विरोधात भोसले गटासोबतच राहिले.
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भोसले आणि उंडाळकर गट एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र काम करण्याचे धोरण स्वीकारले, त्यामुळे दोन्ही गटांतील नेत्यांना एकमेकांशी जुळवून घ्यावे लागले.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री मकरंद पाटील, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून बँक चालवण्यासाठी एकत्र आल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. सर्वच नेते एका व्यासपीठावर आल्याने सामान्यांमध्ये त्याची चर्चा रंगत आहे.
या निवडणुकीसाठी ॲड. उंडाळकर यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यास आमदार डॉ. भोसले हे अनुपस्थित होते. मात्र, माजी आमदार आनंदराव पाटील यांनी हजेरी लावली होती. ॲड. उंडाळकर आणि पाटील हे दोघे शेजारी-शेजारी बसून चर्चेतही दंग असल्याचे दिसून आले.
अनेक वर्षांचे राजकीय शत्रुत्व विसरून ते दोघे एका व्यासपीठावर आले होते. उंडाळकर गटाच्या जिल्हा बॅंकेच्या मेळाव्याला माजी आमदार पाटील हे पहिल्यांदाच त्यांच्यासमवेत व्यासपीठावर आल्याने उपस्थितांनीही भूवया उंचावल्या.
उंडाळकर-वाठारकरांची एकत्रित वाटचाल
माजी मंत्री (स्व.) विलासराव पाटील- उंडाळकर यांच्याविरोधात जिल्हा बॅंकेचे माजी संचालक विलासराव पाटील- वाठारकर यांनीही विधानसभेची निवडणूक लढवली होती. उंडाळकरांविरोधात वाठारकर यांनी अनेक वर्षे राजकीय भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पिढी म्हणजेच, ॲड. पाटील-उंडाळकर आणि राजेश पाटील-वाठारकर हे एकत्रितपणे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. राजकीय शत्रुत्व विसरून ते दोघेही एकत्र आले असून, सध्या ते दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.