Madha Politic's : पवारांच्या राष्ट्रवादीने माढा लोकसभा केला आणखी ‘सेफ’ : जयकुमार गोरेंच्या माणमध्ये राजकीय संघर्ष वाढणार

Pune Graduates constituency NCP SP Victory : पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नवे बळ मिळाले आहे. काँग्रेसच्या साथीने मिळालेला हा विजय माढा लोकसभा मतदारसंघातील २०२९ च्या निवडणुकीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
Harshada Deshmukh-Jadhav
Harshada Deshmukh-JadhavSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 29 October : ज्येष्ठ नेते शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे. विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही ओळख अंधुक झाली होती. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाने ही ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. हा बालेकिल्ला पुन्हा उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला काँग्रेसचीही मोलाची साथ मिळाली. माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या माण (जि. सातारा) विधानसभा मतदारसंघातील देशमुख-जाधव विजयी झाल्याने २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने माढा आणखी लोकसभा सेफ केल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम, खासदार प्रणिती शिंदे, खासदार विशाल पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह इतर नेत्यांची साथ मिळाली. भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव या आमदार सतेज पाटील यांच्या भाची असतानाही त्यांनी आघाडीधर्म पाळला. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत त्यांनी मिळविलेल्या विजयाचाही सकारात्मक परिणाम झाला आहे.

या मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाली असली, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अधिक घट्ट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यात चार आमदार आहेत. त्यातील माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि मोहोळचे आमदार राजू खरे हे पक्षासोबत राहिले, तर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर व करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे भाजपसोबत राहिले. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता या निवडणुकीत अधिक प्रकर्षाने जाणवली.

जिंकताना शरद पवारांच्या विचारांची मते चालतात, आता पवारांचा पक्ष का नको?, असा सवालही अनेक कार्यकर्त्यांनी या आमदारांना विचारला आहे. त्यामुळे आमदार पाटील व जानकर यांचे राष्ट्रवादीसोबतचे अंतर येत्या काळात अधिक वाढत जाण्याची शक्यता आहे.

Harshada Deshmukh-Jadhav
Pune Graduate Election: पुणे पदवीधरच्या निकालाने भाजपला हादरा; थेट दिल्लीहून वरिष्ठ नेते पुण्यात, नगरसेवकांची शाळा भरणार?

सोलापूर जिल्ह्यात माढ्याचे राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. त्याचा मोठा लाभ त्यांना माढा लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी होण्याची शक्यता आहे. पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील यांच्यानंतर दोन वेळा भाजपला ही जागा गमवावी लागली आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि यावेळी हर्षदा देशमुख-जाधव येथून विजयी झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा पगडा दुसऱ्यांदा या मतदारसंघावर राहिला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे मोदी कार्ड फेल

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूरचे सुनील मोदी यांना मैदानात उतरविले होते. ही निवडणूक भाजपच्या डॉ. स्मिता जाधव विरुद्ध राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यातच रंगली. या स्पर्धेत ‘उबाठा’चे मोदी ना प्रचारात स्पर्धेत होते, ना मतदानामध्ये स्पर्धेत होते. त्यांना केवळ तीन हजारांच्या आसपास मते मिळाल्याने पदवीधरमध्ये ठाकरेंचे मोदी कार्ड फेल गेल्याचे दिसले.

Harshada Deshmukh-Jadhav
Satej Patil on Gokul Election: गोकुळमध्ये ट्विस्ट येणार? सतेज पाटलांचं संचालकांना आवाहन VIDEO

‘माण’मध्ये आणखी सक्रीय होणार

माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या माण (जि. सातारा) विधानसभा मतदारसंघात नेतृत्वाचा पेच २००९ पासून आजतागायत कायम आहे. राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये प्रभावी विसंवाद आहे. सोलापूरचे पालकमंत्री तथा माणचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांना या विसंवादाचा लाभ होत आला आहे. हर्षदा देशमुख-जाधव यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपासूनच तालुक्याच्या राजकारणात लक्ष घातले आहे. आता त्यांच्याकडे विधान परिषदेची आमदारकी आल्याने या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा पेच येत्या काळात सुटेल, अशी शक्यता आहे. तालुक्यातील विखुरलेली राष्ट्रवादी येत्या काळात एकमुखी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com