Solapur, 27 September : मोहोळच्या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माझ्याबद्दल जे वक्तव्य आलं, त्यानंतर माझ्यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडचण असेल तर मी मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा तयार ठेवला आहे. तो मी घेऊन पक्षाकडेही गेलो होतो.
अतिशय थंड डोक्याने विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. पक्षाने वेळ मागितल्यामुळे मी थांबलो आहे. येत्या चार दिवसांत पक्षाकडून त्या संदर्भात चर्चा झाली तर ठीक नायतर मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पदाचा राजीनामा देणार असल्याचे ठामपणे सांगितले.
राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर उमेश पाटील यांनी ‘साम’शी बोलताना पक्षाला हा इशारा दिला आहे. ते म्हणाले राजन पाटील यांनी सहकारी साखर कारखाना खासगी करून घेतला आहे. सहकारी संस्था हडप करणाऱ्या व्यक्तीला राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणे, हे सहकारी चळवळीचे अपमान करणारे आहे.
मोहोळच्या जनसन्मान यात्रेत उमेश पाटलांचे (Umesh Patil) नाव न घेता अजित पवार यांनी कडवट शब्दांत टीका केली होती. गाडी आणि कुत्र्याचे उदहारण देत केलेली टीका सहन न झाल्याने उमेश पाटील यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आता मोहोळ राष्ट्रवादीतील वादावर पक्षश्रेष्ठी कसा तोडगा काढतात, हे पाहावे लागेल.
सहकार चळवळ मोडीत काढण्याचा या माणसाचा अनुभव आहे. लोकनेते सहकारी साखर कारखाना त्यांनी खासगी करून हडप केला आहे, त्याचा मी निषेध करतो, असेही उमेश पाटील यांनी म्हटले आहे.
मोहोळ तालुक्याला राज्यमंत्रिपद दिले, त्याबद्दल अभिनंदन करता येईल. मात्र, व्यक्ती चुकीची आहे. राज्यभरातील सहकारी संस्था खासगी कशा करायच्या आणि लुबाडायच्या कशा, यासाठी या व्यक्तीला म्हणून तर अध्यक्ष केलं नाहीये ना, असा सवाल करून उमेश पाटील म्हणाले, राज्यातील सहकारी चळवळीला या व्यक्तीमुळे धोका आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डुबवणाऱ्या व्यक्तीला राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष केलं आहे. या माणसामुळे राज्य सहकारी चळवळीपुढे धोका आहे. सहकार चळवळीला मोडीत काढणाऱ्या माणसाला सहकार परिषदेचे अध्यक्ष केलं गेलं आहे, असा दावाही उमेश पाटील यांनी केला आहे.
माजी आमदार राजन पाटील यांना न्याय देण्याच्या नादात राज्यातील सहकार चळवळ मोडून काढली जातोय, असा आरोपही उमेश पाटील यांनी आपल्याच नेत्यांच्या नियुक्तीवर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.