

Solapur : सोलापूर महापालिकेवर मागील 5 वर्षांची सत्ता सोडता कायम काँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिलेले आहे. काँग्रेसची महापालिकेतील सर्व सूत्रे ही कोठे घराण्याकडे असायची. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला असला तरी पालिकेच्या चाव्या पुन्हा कोठे घराण्याकडेच राहण्याची चिन्हे आहेत. आजोबा, काकानंतर आता आमदार देवेंद्र कोठे यांचा शब्द महापालिकेत प्रमाण राहण्याची शक्यता असून भाजप हायकमांडचा त्यांना असलेला आशीर्वाद पाहता ते शहराचे नवे कारभारी ठरू शकतात. तसेच, महापालिकेचे सत्ताकेंद्र पुन्हा एकदा ‘राधाश्री’मध्ये असणार, हे उघड आहे.
महापालिकेच्या १०२ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने आतापर्यंतची उच्चांकी कामगिरी नोंदवत ८७ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे (Devendra Kothe) आणि मनीष देशमुख यांची रणनीती महत्वाची मानली जाते. त्यातही गोरे, कोठे आणि कल्याणशेट्टी ह्या त्रिमूर्तीने महापालिका निवडणुकीत सक्रीयपणे सूत्रे हलवली.
भाजपच्या नगरसेवकांमध्ये ४१ जण हे गोरे आणि कोठे यांनी वाटप केलेल्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यातही तब्बल १७ नगरसेवक हे पद्मशाली समाजाचे आहेत. भाजपमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये कोठे समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारात आमदार कोठे यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. पूर्वी दोन्ही देशमुख हे सोलापूर (Solapur) महापालिकेचा कारभार पाहायचे, पण आता आमदार कोठे यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.
काँग्रेसच्या काळात आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा (स्व.) विष्णुपंत (तात्या) कोठे यांचा शब्द महापालिकेत अंतिम असायचा. त्यानंतर त्यांचे पुत्र महेश कोठे यांनीही तीच भूमिका निभावली. या काळात सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे महापालिका असली तरी शहराचे कारभारी हे कोठेच होते, महापालिकेची सर्व सूत्रे ही तात्या कोठे आणि महेश कोठे यांच्याकडेच होती. त्यामुळे काँग्रेसच्या काळात कोठे बोले आणि महापालिका हाले, अशी परिस्थिती असायची. आताही देवेंद्र कोठे यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी असणार आहे.
भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले प्रथमेश कोठे यांच्या रुपाने कोठे घराण्यातील दुसरी पिढी पालिकेत कार्यरत असणार आहे. यासोबतच त्यांचे नातेवाईक विनायक कोंड्याल (आतेभाऊ), श्रीकांचना यन्नम (आमदारांची सासू), अजय पोन्नम हेही पालिकेत असणार आहेत. यातील विनायक कोंड्याल यांचे नाव महापौरपदासाठी आताच चर्चेत आले आहे.
महापालिका निवडणुकीत आमदार देवेंद्र कोठे यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. पालकमंत्री गोरे यांनी त्यांच्यासाठी कायमच झुकते माप दिल्याचे दिसून येते. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचा असलेला ‘थेट कनेक्ट’ हेही महत्वाचा ठरणार आहे. आमदार म्हणून त्यांनी गेल्या वर्षभरात दाखवलेली चुणूकही त्यांची वाटचाल शहराचा नवा कारभारी होण्याकडे दर्शविणारी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.