-राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar : गेल्या काही दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. या घटना थांबविण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या गंभीर स्वरूपाच्या घटना नगर शहर आणि जिल्ह्यात का वाढत आहे ? यावर पोलिसांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील गुरुराज एचपी पेट्रोलपंप इथे दुचाकीवर आलेल्या तिघांनी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातून पेट्रोल पंपावरील मॅनेजरची धारदार चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या चाकू हल्ल्यात मॅनेजरचा मृत्यू झाला तर पंपाजवळील हॉटेलवरील एका कर्मचाऱ्यावरही आरोपींनी हल्ला केला. तो कर्मचारी जखमी आहे. कोपरगाव पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.
भोजराज बाबुराव घनघाव (वय 40 वर्ष रा. दहेगाव बोलका ता. कोपरगा) असे मृत्यू झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. याबाबत पेट्रोल पंपावरील कर्मचारी अमोल धोंडीराम मोहिते यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अज्ञात तिंघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (29 जून) एका दिवसभरात तीन गंभीर घटनांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. यात नगर शहरातील केडगाव मंदिर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्या व्यक्तीची हत्या झाली असावी असा संशय आहे. त्यानंतर नगर शहरात सायंकाळी पाईपलाईन रोड भागामध्ये एका युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यानंतर संवत्सर या ठिकाणी पेट्रोल पंपावर मॅनेजरची चाकूने हत्या करण्यात आली.
संगमनेर, अकोले, पारनेर आदी ठिकाणीही विविध कारणातून हत्येच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच नगर शहरांमध्ये संदल उरूस मिरवणूक दरम्यान काही युवकांनी औरंगजेबाचे फोटो नाचवल्याच्या प्रकरणाने शहर आणि जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता.
या सर्व घटनांबाबत सर्वच राजकीय पक्षांनी आवाज उठवला असला तरी कोणत्या घटनांत आवाज उठवण्यासाठी कोणता पक्ष पुढे आला आणि यात कोणी कुणावर राजकीय आरोप केले हे ही पाहावे लागणार आहे. जिल्ह्याची एकूणच कायदा-सुव्यवस्था बिघडलेली असताना सत्तेत असलेले जिल्ह्याचे कारभारी यांची यामुद्यावर केलेली वक्तव्ये सारवासारवी करणारी असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे घाबरलेल्या जनतेला वाली कोण असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.