
रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आणि हायजॅकचा आरोप केला.
अजित पवारांनी यावर पलटवार करत रोहित पवारांना टोला लगावला.
“दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसू नका” असे म्हणत अजित पवारांनी त्यांचा क्लास घेतला.
Ajit Pawar Vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार यांचे काहीसे आक्रमक रुप बघायला मिळत आहे. सरचिटणीस झाल्यानंतर त्यांच्याच ट्विटने मंत्री माणिकराव कोकाटे यांचे रमी खेळण्याचे प्रताप महाराष्ट्रापुढे आले होते. हे प्रकरण महाराष्ट्रभर प्रचंड गाजले. त्यानंतर कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले.
त्यानंतर पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये अयोग्य वागणूक मिळाल्याच्या प्रकरणात 3 युवतींची तक्रार दाखल करून घेण्यात येत नव्हती. त्यावेळी पोलीस ठाण्यातील त्यांनी आंदोलन केले. भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी शिफारस झाल्यानंतर, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुत्राने रॅपिडोचे घेतलेले प्रायोजकत्व अशा प्रकरणात त्यांच्यातील विरोधी पक्षनेता दिसून आला होता.
नुकतंच रोहित पवार यांनी कोकणातील एका नेत्याने अजित पवार यांचा पक्ष हायजॅक केला आहे, अशी जहरी टीका केली होती. त्यांच्या टीकेचा रोख खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे होता. पण रोहित पवारांच्या उंच उडणाऱ्या या पतंगाची दोर आता उपमुख्यमंत्री अजित पवार केवळ दोनच वाक्यात यांनी कापला आहे.
आज अजित पवार कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना रोहित पवार यांच्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, "काही जणांना वाटतं, आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व यांच्याकडेच आहे", अशी उपहासात्मक टीका केली. तसेच "त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, आम्ही आमच्या पक्षाचा बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही, अशा शब्दात फटकारलं आहे.
अजितदादा एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी सांगलीतील कार्यक्रमात जाहीरपणे रोहित पवार यांचा समाचार घेतला. मघा काहींनी (रोहित पवार यांना नाव न घेता उद्देशून) सांगितलं की, दादाचं गावकीकडं लक्ष आहे, जरा भावकीकडंही लक्ष द्या. अरं भावकीकडं लक्ष दिलं; म्हणूनच तू आमदार झालास. जयंतराव त्याला विचारा, किती मतं पडली आहेत, पोस्टल बॅलेटवर आला आहात आपण, असा टोला त्यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला.
अजितदादा पुढे म्हणाले, मी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आर. आर. पाटील असे आम्ही 1990 पासून 1999 पर्यंत ज्युनिअरच होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जसं सांगतील तसं आपण करायचं, असं आम्ही ठरवलं होतं. 2004 मध्ये आमची कुठं विचारपूस करायला लागले होते. पण काही जणांना वाटतं की, पहिल्या टर्मलाच आपण मोठं झालं पाहिजे. मी भाषण केलं पाहिजे, असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला.
ते म्हणाले, मी माझ्या पक्षाचे काम करतो, जयंतराव पाटील त्यांच्या पक्षाचे काम करतात. पण माझ्या पक्षात मी काय करावं, याचे दुसरेच सल्ले देऊ लागले आहेत. मला तर काहींचं कळतंच नाही. तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय करायचं नाही. त्यामुळे माझ्या कोणी नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी एक अक्षर बोलणार नाही, असेही अजितदादांनी रोहित पवार यांना सुनावलं.
प्र. 1: रोहित पवारांनी कोणावर टीका केली होती?
उ. 1: त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.
प्र. 2: अजित पवारांनी रोहित पवारांना काय इशारा दिला?
उ. 2: “दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसू नका” असा टोला लगावला.
प्र. 3: हा वाद कोणत्या पक्षाशी संबंधित आहे?
उ. 3: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये हा वाद सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.