

Ajit Pawar’s photo Row: मंगळवेढा येथील भूमी अभिलेख कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा कार्यालयाच्या कपाटात ठेवल्याचा प्रकार समोर आला. याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ माळी यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. अजित पवार यांची प्रतिमा पुन्हा कार्यालयाच्या भिंतीवर लावत पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने जुलै २०२६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा समावेश ‘थोर राष्ट्रपुरुष व व्यक्ती’ यांच्या शासकीय जयंती यादीत करण्यात आला आहे. त्यानुसार २२ जुलै रोजी विविध शासकीय कार्यालयांमध्ये अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात आली होती.
अजित पवार जयंतीनिमित्त लावण्यात आलेली त्यांची प्रतिमा त्यानंतर कार्यालयातील कपाटात ठेवण्यात आल्याचे सोमनाथ माळी यांनी म्हटले आहे. शासकीय कामानिमित्त माळी आणि त्यांचे समर्थक भूमी अभिलेख कार्यालयात गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. कार्यालयातील अधिकारी नियोजित वेळेनंतर उशिरा आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अधिकाऱ्याला याबाबत जाब विचारताना अजित पवार यांची प्रतिमा इतर मान्यवरांच्या प्रतिमांबरोबर भिंतीवर दिसत नसल्याचे माळी यांच्या लक्षात आले. चौकशी केल्यानंतर प्रतिमा कपाटात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अजित पवार यांनी मंगळवेढ्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. शासनानेच त्यांच्या नावाचा समावेश थोर राष्ट्रपुरुष व व्यक्तींच्या शासकीय जयंती यादीत केला असताना त्यांची प्रतिमा कपाटात ठेवणे योग्य नसल्याचे माळी यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर अजित पवार यांची प्रतिमा कार्यालयाच्या भिंतीवर पुन्हा लावण्यात आली. माळी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शासनाने अजित पवार यांचा ‘थोर राष्ट्रपुरुष व व्यक्ती’ यांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाने इतर मान्यवरांप्रमाणे अजित पवार यांच्या प्रतिमेलाही योग्य तो सन्मान द्यावा. तसे न झाल्यास संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ माळी यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.