शिर्डी ( जि. अहमदनगर ) - भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांची एका कार्यक्रमात मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी तोंडावर आलेली विधानपरिषद निवडणूक आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपने खेचून आणलेल्या सहाव्या जागेवरून सुरू असलेल्या वाद-विवादाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षा व्यक्त करून या वादास नव्याने फोडणी दिली. ( Ajit Pawar should come with us again: Devendraji should bring BJP government in the state )
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यातील विविध समाजघटकांच्या हितासाठी अजितदादांनी पुन्हा आमच्या सोबत यावे. आणि देवेंद्रजींनी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Radhakrishna Vikhe Patil News)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी सांगितले की, फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपचे सरकार आणावे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्या सोबत यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी आणि मितभाषी आहेत. परंतु त्यांनी चुकीच्या सल्लागारांना बाजूला करावे. यापुढे मला विरोधी पक्षनेता नव्हे, तर मंत्री होणे आवडेल. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा आणि योग्यच होता. वडील सल्ला देण्यासाठी नसताना मी घेतलेला तो पहिलाच मोठा राजकीय निर्णय होता, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्यावर प्रभाव आहे. मोदी यांनी कोविड काळात लसनिर्मितीला प्राधान्य दिले. जनतेला 180 कोटी लसमात्रा देऊन जगात सर्वोत्तम कामगिरी केली. रशिया-युक्रेन म्हणजेच एका अर्थाने रशिया-अमेरिका युद्धात मोदींनी मध्यस्थी करावी, असे जगातील काही देशांचे प्रमुख म्हणतात, ही देशाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. माझे वडील माजी खासदार कै. बाळासाहेब विखे पाटील यांचा माझ्या जीवनावर नेहमीच प्रभाव राहिला, असेही त्यांनी मुलाखतील सांगितले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. सचिन गोर्डे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सर्वाधिक दुःखाचे प्रसंग
1995 साली तत्कालीन आमदार अण्णासाहेब म्हस्के यांनी माझ्यासाठी मतदारसंघ उपलब्ध करून दिला. मी आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घेतली, तो माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, तर वडील आणि आईचे निधन, हे सर्वाधिक दुःखाचे प्रसंग होते, असा भावनिक प्रसंग त्यांनी सांगितला.
अब्दुल सत्तारांना सल्ला
मंत्री अब्दुल सत्तार हे माझे जुने मित्र आहेत. त्यांनी संयम ठेवणे शिकावे, असा माझा त्यांना सल्ला आहे. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना आपण कुठलाही सल्ला देऊ इच्छित नाही, असा टोलाही त्यांनी थोरातांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.