
Summary :
अजित पवारांनी पुण्यात वाढत्या नागरीकरण आणि वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून तीन नवी महापालिका निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला.
फडणवीसांनी या प्रस्तावाला नकार देत पुण्याला तूर्तास तिसऱ्या महापालिकेची गरज नाही असे स्पष्ट केले.
दोन्ही नेत्यांच्या भिन्न मतामुळे पुणे महापालिका वाद राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.
Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या नागरीकरणावर भाष्य करताना त्यांनी पुण्यात आणखी तीन महापालिकांची गरज असल्याचे वक्तव्य केले. यासाठी त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी महापालिकांचाही उदाहरण दिले. मात्र, अजित पवार यांच्या विधानानंतर काही तासांतच पुणे दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याला तूर्तास तिसऱ्या महापालिकेची गरज नाही, भविष्यात विचार करू, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर जे अजित पवार यांच्या डोक्यात आहे ते फडणवीस यांच्या मनात का नाही? असा प्रश्न राजकीय वर्तुळातुन विचारला जात आहे. (Ajit Pawar’s Call for Three More Municipal Corporations in Pune Sparks Political Debate as Devendra Fadnavis Disagrees)
पुणे जिल्ह्यात तीन नव्याने महापालिकांची गरज असून, मांजरी-फुरसुंगी उरुळी देवाची, चाकण आणि हिंजवडी अशा तीन महापालिका भविष्यात कराव्या लागणार आहेत. कोणाला आवडो वा ना आवडो पण वाढती ट्रॅफिकची समस्या आणि या परिसरात झपाट्याने होणारे नागरीकरण यामुळे हे करावं लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं होतं.
त्यावर फडणवीस म्हणाले, नव्या महापालिकेची तूर्तास गरज नाही. पी.एम.आर.डी.एच्या स्वरूपात पुणे महानगर क्षेत्राचे स्वतंत्र नियोजन समिती अस्तित्वात आहे. तीन महापालिका म्हणजे दोन ऑलरेडी पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिका आहेत. अजून एक, अशा तीन करा, असे अजित पवार यांचे म्हणणे आहे. अजून तीन नाही, असं फडणीस यांनी स्पष्ट केलं.
पुणे जिल्ह्याचा राजकारणाचा आलेख पाहिला तर 2017 पूर्वी पुणे जिल्ह्यावर पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होतं. एक प्रकारे अजितदादांची सत्ता पुणे जिल्हा परिषदेसह जिल्ह्यात येणाऱ्या दोन पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवर होती. मात्र 2017 ला दादांच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपने आपलं वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली. सध्याच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका एक प्रकारे भाजपचा गड बनल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
एकीकडे दोन्ही महापालिकेतील शहरी भागांवर भाजपने वर्चस्व मिळवलेलं असताना या महापालिकेतील उपनगरे आणि लगतच्या गावातील परिसरात मात्र अद्यापही अजित पवार नेतृत्वातील राष्ट्रवादीचा दबदबा असल्याचं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायला मिळालं. हडपसर परिसरातील उरळी, फुरसुंगी भागामध्ये नवीन महापालिका निर्माण करावी असं वक्तव्य दादांनी केला आहे. या भागामध्ये अजित पवारांचे चेतन तुपे हे आमदार आहेत. दादांनी हिंजवडी परिसरामध्ये दुसरी महापालिका करावी असं सुचवलं आहे. तो भाग देखील भोर, मुळशी विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. त्या ठिकाणी देखील शंकर मांडेकर हे अजित पवारांच्या पक्षाचेच आमदार आहेत. तर तिसरी महापालिका चाकण परिसरामध्ये करण्याचा मानस अजित पवार यांचा आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खेडमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी अजित पवार यांच्या पक्षाची मोठी ताकद या भागात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकांचं आश्वासन देऊन आपला खुट्टा आणखी बळकट करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केलाय का? अशी शंका या अनुशंगाने अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.
त्यामुळे या भागातील राजकीय समीकरणं पाहता अजित पवार यांनी महापालिका करण्याचा घेतलेला निर्णय हा भाजपच्या वाढत चाललेल्या पुणे जिल्ह्यातील ताकतीला रोखण्याचा प्लॅन आहे. तसेच आपला गड बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दादांची या मागची गणितं ओळखूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या सर्व गोष्टींना नकारात्मक प्रतिसाद देऊन दादांच्या रणनीतीला शह दिला का? अशा चर्चा सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भाजपने पुणे जिल्ह्यामध्ये विरोधातील मातब्बर नेते आपल्याकडे वळवून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून रणनीती आखली आहे. माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्यासारखे मातब्बर येथे आपल्या गोटात घेऊन एक प्रकारे अजित पवारांना आव्हान उभे करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. आणि याच आव्हानाला प्रति आव्हान देण्याच्या दृष्टिकोनातून देखील अजित पवारांनी तीन महापालिकांचं अस्त्र बाहेर काढले का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
प्र.१: अजित पवारांनी काय प्रस्ताव दिला?
उ: पुण्यात वाहतूक आणि नागरीकरणावर उपाय म्हणून तीन महापालिका तयार करण्याचा प्रस्ताव दिला.
प्र.२: देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली?
उ: पुण्याला सध्या तिसऱ्या महापालिकेची गरज नाही, भविष्यात विचार करू असे सांगितले.
प्र.३: हा वाद राजकारणात का चर्चेत आहे?
उ: अजित पवार आणि फडणवीस यांच्या भिन्न मतामुळे पुण्याच्या नागरी विकासावर राजकीय चर्चा रंगली
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.