Ajit Pawar : अजितदादांचे कऱ्हाडशी होते हळवे नाते....अडचणीच्या काळात प्रीतिसंगम ठरायचे ऊर्जेचे ‘स्टेशन’!

Ajit Pawar & Karad : अजित पवार यांच्यासाठी साताऱ्यातील कऱ्हाड हे केवळ राजकीय केंद्र नव्हते, तर प्रेरणा, आत्मचिंतन आणि नव्या उभारीचे भावनिक ठिकाण होते. त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात या शहराला विशेष स्थान होते.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Karad, 29 January : राजकारणात अनेक नेते असतात, पण काही जणांच्या आयुष्यात एखाद्या ठिकाणाशी जुळलेले भावनिक नाते त्यांच्या निर्णयांइतकेच महत्त्वाचे ठरतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदाऱ्या सांभाळताना अजित पवार यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड हे असेच एक आपल्या भावना व्यक्त करण्याचे भावनिक हळवे ठिकाण होते. कारण, कऱ्हाड ही केवळ एक राजकीय भूमी नव्हती, तर त्यांच्या दृष्टीने ती प्रेरणेची, आत्मचिंतनाची आणि नव्याने उभारी घेण्याची जागा होती.

कऱ्हाड म्हणजे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (yashwantrao chavan) यांची कर्मभूमी. याच भूमीतून त्यांनी पुरोगामी, सुसंस्कृत आणि विकासाभिमुख महाराष्ट्राची संकल्पना रुजवली. अजित पवार यांनी यशवंतरावांना केवळ ऐतिहासिक नेता म्हणून नव्हे, तर राजकारणातील मार्गदर्शक म्हणून मान दिला. त्यामुळे कराडला भेट देणे हे त्यांच्या दृष्टीने केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित राहत नसे, तर ती एक वैयक्तिक आणि भावनिक भेट असायची.

राजकीय आयुष्यात चढउतार येतच राहतात. कधी टीका, कधी वाद, कधी अपयश येते, पण अशा प्रत्येक टप्प्यावर अजितदादा कऱ्हाडला येत असत. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन काही क्षण शांत बसणे, पुष्पचक्र अर्पण करणे आणि मनन करणे हा त्यांचा नेहमीचा क्रम होता.

मोठ्या गडबडीतही कऱ्हाडच्या या भेटी त्यांच्या दृष्टीने अत्यंत खास असत. इथे आलो की मन शांत होतं, असे ते जवळच्या सहकाऱ्यांशी बोलताना सांगत होते. राजकारणातील गोंधळ, आरोप-प्रत्यारोप, निर्णयांचा ताण या सगळ्यातुन वेळ काढून ते कऱ्हाडच्या शांत वातावरणात स्वतःशी संवाद साधत. त्या भेटीनंतर त्यांच्या कामकाजात नवी उर्जा दिसत असे.

उपमुख्यमंत्री अजितदादांचे कऱ्हाडशी नाते केवळ स्मारकापुरते नव्हते. यशवंतरावांनी ज्या पद्धतीने ग्रामीण भागाचा विकास, सहकार चळवळ आणि शिक्षण यांना चालना दिली, त्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न अजितदादांनी आपल्या कामकाजातून केला. त्यामुळे कऱ्हाड हे त्यांच्या दृष्टीने विचारांचे, उर्जेचेच केंद्र होते. कऱ्हाडला येऊन ते केवळ यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी श्रध्दांजली वाहत नसत, तर स्वतःच्या कामकाजाचा आढावाही घेत.

Ajit Pawar
Ajit Pawar : कार्तिकीची महापूजा करणाऱ्या अजितदादांची ‘ती’ इच्छा अखेर अधुरीच राहिली...

स्थानिक नागरिकांच्या आठवणीतही अजितदादांचे कऱ्हाड दौरे वेगळे ठरले आहेत. अनेकदा ते कोणताही गाजावाजा न करता आले. स्मारकाला भेट देऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी साधेपणाने संवाद साधला. राजकीय भाषणांपेक्षा आठवणी, यशवंतरावांच्या कार्याचा उल्लेख आणि त्यांनी दाखवलेला मार्ग विसरू नका, असा संदेश त्यांनी आयुष्यभर दिला. त्यामुळे कऱ्हाडकरांनाही त्यांच्याबद्दल एक जिव्हाळ्याची भावना होती.

यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यशैलीत सुसंस्कृतपणा, संयम आणि विकासाची दृष्टी होती. अजित पवार यांच्या स्वभावातही निर्णय क्षमतेसोबत कामकाजाला प्राधान्य देण्याची शैली होती. कऱ्हाडच्या भेटींमधून हीच प्रेरणा त्यांनी घेतली, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगीतले.

एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, नवीन जबाबदारी स्वीकारायची असेल किंवा राजकीय संकटाचा सामना करायचा असेल तर कऱ्हाडची भेट त्यांना मानसिक आधाराचे बळ देणारी ठरत असे. कऱ्हाड ही त्यांच्यासाठी राजकीय केंद्र नव्हते, तर भावनिक आधार देणारी जागा होती. राजकारणात धावपळ, गोंधळ आणि संघर्ष यांच्यातही एखादी जागा मनाला स्थिरता देत असेल, तर ती नाती फार मोलाची ठरतात.

अजितदादांसाठी कऱ्हाड हे असेच एक ठिकाण होते, जिथे ते राजकारणी म्हणून नव्हे, तर यशवंतरावांच्या विचारांचा अनुयायी म्हणून येऊन प्रेरणा घेऊन परत जाऊन राज्याच्या राज्यकारभारात झोकून देत. म्हणूनच कऱ्हाड आणि अजित पवार यांचे नाते हे केवळ राजकीय नव्हे, तर श्रध्दा, कृतज्ञता आणि विचारांशी असलेली बांधिलकी व्यक्त करणारे होते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात हे नाते एक वेगळा मानवी स्पर्श देऊन जाणारे ठरते.

Ajit Pawar
Videep Jadhav : ‘बारामतीची सभा आटोपली की घरी येतोय....’: अजितदादांच्या अंगरक्षकाची वडिलांशी भेट झालीच नाही

अजितदादांचा कराड दौरा अन्‌ मोठे निर्णय

राजकारणातील ताणतणाव, आरोप–प्रत्यारोप आणि सत्तेतील उलथापालथींच्या काळात अजितदादा अनेकदा कऱ्हाडला येत असत. मोठ्या राजकीय निर्णयांपूर्वी किंवा संकटाच्या टप्प्यावर ते यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाला आवर्जून भेट देत. अनेकदा दादा अचानक कऱ्हाडला जाऊन आले म्हणजे काहीतरी मोठा निर्णय घेणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असायची. कऱ्हाडची त्यांची भेट केवळ श्रध्देची नाही तर मानसिक आणि राजकीय उर्जेचा स्रोत ठरत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com