आटपाडी (जि. सांगली) : आटपाडी (Aatpadi) कृषी उत्पन्न बाजार समितीचा आखाडा भारतीय जनता पक्ष (BJP) विरुद्ध शिवसेना (Shivsena शिंदे गट) यांच्यात सरळ दुरंगी लढतीचा राजकीय जाणकारांचा अंदाज असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने एकत्रित येऊन निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आटपाडी बाजार समितीची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. (Alliance between NCP and RSP in Aatpadi Bazar Committee elections?)
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्व जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसेच, शिवसेनेनेही (शिंदे गट) सर्वच जागेसाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर राष्ट्रीय समाज पक्षानेही स्वतंत्र काही जागेसाठी उमेदवारी दाखल केले आहेत.
केंद्रात आणि राज्यात एकत्रित सत्तेत असतानाही भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) मात्र बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकमेकांच्या विरोधात लढण्याची तयारी केली आहे. भाजप आणि शिवसेनेमध्येच दुरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतंत्र तिसरा पर्याय मतदारांना देण्यासाठी तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षासोबत एकत्रित निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने नुकतीच बैठक घेतली. काँग्रेसने शिवसेनेसोबत हात मिळवणी केल्याचे प्राथमिक चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि रासपने मतदारांना तिसरा पर्याय देणाच्या दृष्टीने हालचाली गतिमान केल्या आहेत. तसे झाल्यास त्यांचा कोणाला फटका बसणार यावर चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात राष्ट्रवादी आणि रासप एकत्रित निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का?, याकडे लक्ष लागले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीने बैठका आणि हालचाली सुरू केल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.