मोहोळ (जि. सोलापूर): राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश चिटणीस तथा मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर हे सोलापुरातील पक्षाची कामे उरकून मोहोळकडे येत होते. पुणे-सोलापूर महामार्गावर सावळेश्वर टोलनाक्यावर त्यांच्या गाडीला पाठीमागून ठोकरण्याचा प्रयत्न झाला. बारसकर यांनी या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे. (An attempt to put a truck on the body of a NCP leader)
दरम्यान, माझ्या अंगावर जाणून बुजून ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला आहे. माझ्या जिवाला धोका असून मला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी रमेश बारसकर यांनी केली आहे. मोहोळ तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सोलापुरातील राष्ट्रवादी पक्षाची कामे आटोपून राष्ट्रवादीचे नेते रमेश बारसकर आणि त्यांचे स्वीय सहायक शीलवंत क्षीरसागर हे आपल्या गाडीतून (एमएच ४२, बीबी १९२०) मोहोळला येत होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्यावर त्यांची गाडी साधारणपणे चारच्या सुमारास आली. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (केए ५६/१३१५) बारसकर यांच्या गाडीला धडक देण्याचा प्रयत्न केला. ट्रक त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, प्रसंगावधान राखून रमेश बारसकर यांच्या गाडीचा चालक ईशान खारकदारी (रा. मोहोळ) याने गाडी बाजूला थांबवली. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पळत येऊन ट्रकचालकास खाली उतरविले. त्याचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव शांतलिंगेश्वर बाबूराव ढाले (रा. नांदगाव, ता. तुळजापूर) असल्याचे सांगितले. मोहाेळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.
राजकीय विरोधकांकडून आपल्या जिवितास धोका असल्याचे बारसकर यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. मोहोळ शहरातील ब्रह्मदेव गायकवाड, पंडित देशमुख, नरखेड येथील सुहास उबाळे यांचा अपघाताचा बनाव करून यापूर्वी खून करण्यात आला आहे, असेही त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. यामधील काही प्रकरणे न्यायालयात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यावरही खुनी हल्ला झाल्याचे बारसकर यांनी आपल्या अर्जात म्हटलेले आहे.
विविध राजकीय पक्षांचा विरोध पत्करून बारसकर यांनी मोहोळचे प्रथम नगराध्यक्षपद भूषविले होते. मोहोळ नगर परिषदेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे. एका पार्टीचा नेता म्हणून काम करीत असल्याने जाणून-बुजून माझ्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केल्याचा संशय बारसकर यांनी अर्जात नमूद केला आहे. अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करणारा चालक शांतलिंगेश्वर ढाले, ट्रकमालक आणि क्लीनर महादेव विलास सुरवसे (रा नांदगाव) यांचे कॉल डिटेल्स तपासावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बारसरकर यांनी केली आहे.
यासंदर्भात मोहोळचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रकरणी चौकशी करण्यात आलेली आहे. यात घातपाताचा प्रकार नसल्याचे पुढे आले आहे, असे घुगे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.