Mangalvedha, 13 November : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक राजकीय घडामोडी घडत आहेत. मंगळवेढ्याचे बबनराव आवताडे यांनी पुतण्या भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना धक्का देत काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बबनराव आवताडे यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे हेही भालकेंच्या पाठीशी उभे राहिले आहेत, त्यामुळे पंढरपूरची लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे.
पंढरपूर मतदारसंघातून (Pandharpur Constituency) महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे, काँग्रेसकडून भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिलीप धोत्रे हे निवडणूक लढवित आहेत. चारही उमेदवार बलाढ्य असल्याने पंढरपूर मतदारसंघातील निवडणूक दिवसेंदिवस रंगत चालली आहे.
दरम्यान, मंगळवेढा खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी संचालक बबनराव आवताडे यांनी काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे यांच्या उपस्थितीत पाठिंब्याची घोषणा केली.
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेले भगीरथ भालके यांचा निसटता पराभव झाला होता. त्या निवडणुकीत आवताडे यांचे चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांना पडलेली मते पोटनिवडणुकीत निर्णायक ठरली होती. तीच मते आता भालके यांच्या पाठिशी उभे करण्याचा निर्णय आवताडे यांनी घेतला आहे.
बबनराव अवताडे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता, त्या निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 45 हजार 523 मतांचे लीड प्रणिती शिंदे यांना मिळाले होते. त्यात आवताडे यांचाही वाटा होता, त्यामुळे आवताडे यांनी भालके यांना दिलेला पाठिंबा महत्वपूर्ण ठरणार आहे.
भालकेंच्या पाठिंब्या निर्णयावेळी आवताडे आणि भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बबनराव आवताडे यांचेकडे खरेदी विक्री संघ, कृषी उद्योग संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीसह तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी, दामाजी नगर या मोठ्या ग्रामपंचायतींसह लगतच्या काही ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे.
आवताडेंचे पाठबळ प्रेरणादायी : भालके
मी सुरू केलेल्या चुकीचा माणूस बदलण्याच्या लढाईला बबनराव आवताडे आणि त्यांच्या समर्थकांनी दिलेले पाठबळ माझ्यासाठी निश्चितच मोठे आणि प्रेरणादायी आहे. आगामी काळात मंगळवेढा नगरपालिका आणि इतर सर्वच निवडणुका त्यांच्या सोबत राहून लढवल्या जातील, असे काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांनी स्पष्ट केले.
ठेकेदाराची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी निर्णय : आवताडे
ठेकेदाराची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार असावा, अशी मागणी सर्व समर्थकांनी ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांच्यासमोर मांडली होती. सर्वांशी चर्चा केल्यानंतर आम्ही भगीरथ भालके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी सांगितले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.