Ahmednagar Political News : भारतीय जनता पक्ष हस्तक्षेप करत काँग्रेस किंवा इतर पक्षात फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सरकारी तपासी यंत्रणेचा दबाव विद्यमान आमदार आणि लोकप्रतिनिधींवर आणला जात आहे. यातून काही जण भाजपमध्ये जात आहेत. अशातच मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी हे काँग्रेस सोडून गेले आहेत. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी एका वाक्यात भाष्य करून मूळ भाजपवाल्यांचे टेन्शन वाढविले.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, 'मिलिंद देवरा किंवा बाबा सिद्दीकी म्हणजे, काँग्रेस नाही. पण भाजपमध्ये असे बाहेरचे लोक घेण्याचे वाढते प्रकार पाहता माझा मूळ भाजपवाल्यांना प्रश्न आहे, तुमचे काय होणार? भाजपमध्ये अटलजींनतर चांगले व्यक्तिमत्व म्हणजे नितीन गडकरी आहेत. त्यांना राजधर्म कळतो. ज्या पक्षात मोठे झालो, तो पक्ष सोडता कामा नये, असे त्यांचे म्हणणे आहे. उंदरांसारखे पळणे व इकडून तिकडे उड्या मारण्याच्या राजकारणातील प्रकारावरही ते नाराजी व्यक्त करतात.'
'दुसरीकडे भाजपमध्ये बाहेरचे लोक घेण्यावर भर दिला जात असल्याने मूळ भाजपवाल्यांचे आता काय होणार, असा माझा त्यांना सवाल आहे,' असे स्पष्ट करून आमदार थोरात म्हणाले, 'कोणी बाहेर पडल्याने पक्षाचे नुकसान होत नाही. झाडाच्या फांद्या छाटल्यावर नवी पालवी फुटते. काँग्रेस कोणावरही अवलंबून नाही, याचा अनुभव मागेही आला आहे. आताही 2024 लाही येणार आहे,' असा दावाही त्यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'जलनायक व खलनायक...
निळवंडे धरण व कालवे होणार नाही, पाणी येणार नाही, असे बोलले जात होते. पण धरण झाले व पाणीही आता आले आहे. ते वंचित प्रत्येक घटकाला मिळावे, असा नियोजन आराखडा सरकारला दिला आहे. त्यांनी नाही राबवला तर पुढच्या आमच्या सरकारच्या काळात राबवू, असा दावा आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. निळवंडे धरणाचे श्रेय कोणी घेतही नाही व कोणी कोणाला देतही नाही. त्यांनीच जलनायक व खलनायक म्हणून सारे काही स्पष्ट केले आहे, असे सूचक भाष्यही पालकमंत्री विखेंचे (Rashakrishn Vikhe) नाव न घेता आमदार थोरातांनी केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.