Kolhapur Political News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यासह देशभरात काँग्रेस आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आंदोलनं, मोर्चे काढत तीव्र निषेध करण्यात येत आहे. विरोधी पक्षांनीही मोदी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. याचवेळी कोल्हापुरातलं राजकारण चांगलंच पेटल्याचं समोर येत आहे.
कोल्हापूर(Kolhapur) शहरातील मुख्य चौकांमध्ये मध्यरात्री अज्ञातांनी 'मोदी हटाव, देश बचाओ' बॅनर लावले आहेत. हे पोस्टर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. जनता बाजार चौक, माऊली चौक, पार्वती टॉकीज यांसारख्या महत्त्वाच्या चौकात 'हे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर कुणी लावले याबाबत अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या पोस्टरमुळे भाजप आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.
मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना 'मोदी हटाव, देश बचाओ' पोस्टर निदर्शनास आले.या नागरिकांनी या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. आता हे पोस्टर कुणी लावले याचा शोध पोलीस घेत आहे. मात्र, या पोस्टरबाबत राजकीय पार्श्वभूमी असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीत 'आप'ने लावलेल्या पौस्टरसारखे हे बॅनर असल्याचं बौललं जात आहे.
देवकर पाणंद परिसरात लावलेला या आशयाचा फलक मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या एका नागरिकानं फाडून टाकल्याचा प्रकारही घडला आहे.
खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींवर 'ही' वेळ
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'मोदी' आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.
त्यानंतर आता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना शासकीय निवास्थान सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खासदारकी गेल्यानंतर आता शासकीय निवासस्थान सोडण्याची वेळही त्यांच्यावर आली आहे.
सुरत न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी देणार आव्हान
'मोदी' आडनावावर वादग्रस्त विधान केल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली आहे. सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे. या कारवाईला आव्हान देणारी याचिका काँग्रेसकडून दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात येत्या दोन दिवसात काँग्रेस न्यायालयात धाव घेणार आहे. याबाबतची याचिका तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.