बार्शी (जि. सोलापूर) : जादा परताव्याच्या अमिषाने बार्शी (barshi) आणि राज्यभरातील शेकडो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा विशाल अंबादास फटे (vishal phate) याला आज (ता. १८ जानेवारी) बार्शीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आणण्यात आले. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी अख्खी बार्शी लोटली होती. फटेला कोर्टात नेताना आणि आणताना रस्त्यावरील वाहतूकही थांबवली होती. न्यायालयाच्या आवारात प्रचंड बंदोबस्त होता. (Barshi's vishal Fate was remanded in police custody for ten days)
दरम्यान, बार्शीचे अतिरिक्त न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी विशाल फटे याला २७ जानेवारीपर्यंत म्हणजे १० पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला. सरकारी वकील ॲड. प्रदीप बोचरे यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडली, तर ॲड विशालदीप बाबर (सांगोला) यांनी फटेच्या वतीने किल्ला लढवला. फटे हा बार्शीच्या न्यायालयात उभा राहताच त्याचे वकिल बाबर यांनी ‘हा तांत्रिक घोटाळा आहे. आरोपीला कमीत कमी पोलिस कोठडी मिळावी’, असे भूमिका मांडली. मात्र, न्यायाधीशांनी सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकून १० दिवसांची कोठडी सुनावली.
बार्शीत विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा.लि., अलका शेअर सर्व्हिसेस, जे. एम.फायनान्सियल सर्व्हिसेस या वित्तीय अस्थापना स्थापन करून गुंतवणुकदारांना जादा परताव्याच्या अमिषाने विशाल फटे याने कोट्यवधी रुपयांना फसवले आहे. आतापर्यंत ५० जणांनी फसवणुकीची तक्रार दिली असून त्यांची तब्बल १९ कोटी रुपयांपर्यंत रक्कम जाते. प्रत्यक्षात फसवणुकीचा आकडा मोठा असल्याचे सांगितले जात आहे. फटेच्या अंगझडतीत त्याच्याकडून पंचासमक्ष 1 लाख 68 हजार 290 रुपये जप्त करण्यात आले.
प्रसार माध्यामातून याबाबतच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर विशाल फटे याने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आपण कोणाचीही फसवणूक केलेली नाही. मी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होणार असल्याचे सांगितले हेाते. त्याप्रमाणे तो सोमवारी रात्री उशिरा सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कार्यालयात हजर झाला होता. त्याला कोणीही न ओळखल्याने त्याने स्वतःच पोलिसांना ‘मी विशाल फटे,’ अशी ओळख करून दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. यापूर्वी त्याचे वडील अंबादास फटे व वैभव फटे यांना अटक झाली असून 15 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याबाबतची फिर्याद दीपक अंबारे यांनी 14 जानेवारी रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली होती.
न्यायालयात काय घडले
न्यायालयात विशाल फटे यास उभे करताच सरकारी वकील ॲड प्रदिप बोचरे यांनी युक्तीवादास सुरुवात केली. ते म्हणाले कीह, तीन वित्तीय अस्थापनांमध्ये गुंतवणूक करण्याकरिता फटे यांनी जादा परताव्याचे आमिष दाखवले. वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही रक्कम गुंतवणूक करणार आहे, असे तो नागरिकांना सांगत होता. दहा लाख रुपयांचे वर्षअखेरीस 6 कोटी रुपये देण्यात येतील, असे एक पत्रक काढून तो गुंतवणुकदारांना आकर्षित करत होता. गुंतवणूक रकमेचा अपहार करुन संगनमताने फसवणूक केली आहे. तीन कंपन्यांची मुळ कागदपत्रे तसेच फटे याने कोणत्या कंपनीत कोणत्या योजनेत कशा पध्दतीने गुंतवणूक केली आहे, त्याबाबतचा कागदोपत्री पुरावा इलेक्ट्रॉनिक्स पुरावे हस्तगत करावयाची आहेत.
गुंतवणुकीतील रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली की कोणाकडे दिली आहे याचा तपास करायाचा आहे. अपहारित रकमेतून जंगम मालमत्ता खरेदी केली आहे का?यासह अन्य ठिकाणची कार्यालये,आणखी कोणी मदत केली का अशा घटनांचा तपास करायचा आहे, त्यामुळे फटे याला 14 दिवस पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयास करताच न्यायालयाने दहा दिवस पोलिस कोठडी सुनावली.
फटेला आणल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली
दरम्यान विशाल फटे यास बार्शी न्यायालयात उभे करणार असल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरताच मोठी गर्दी न्यायालयाबाहेर सकाळी अकरापासूनच सुरू झाली होती. पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, तालुका पोलिस असा मोठा बंदोबस्त न्यायालयाच्या आवारात लावला होता. सायंकाळी पाचच्या दरम्यान फटे यास न्यायालयात आणताना व नंतर सोलापूर येथे परत घेऊन जाताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिक, गुंतवणुकदार यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी या वेळी वाहतूक बंद ठेवली होती.
विशाल फटे याचे मामा दत्ता सावंत (रा. वासूद रोड, सांगोला) यांना विशाल याला अटक केल्याची माहिती दिली. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस उपअधीक्षक संजय बोठे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.