सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात तुल्यबळ लढाई झाली. या लढाईत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा तब्बल 74 हजार मतांनी पराभव केला.
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजप ( Bjp ) नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. स्थानिक नेते त्या पराभवातून अजूनही सावरल्याचं पाहायला मिळत नाही. असाच काहीसा प्रकार पंढरपुरात समोर आला आहे.
पंढरपुरातील काही व्यापारी आपल्या समस्या घेऊन भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक ( Prashant Paricharak ) यांच्याकडे गेले होते. यावेळी व्यापाऱ्यांनी समस्या मांडताच निवडणूक निकालावरून नाराज असलेल्या परिचारक यांनी, "द्या की मतं काँग्रेसला" असं म्हणत एकप्रकारे राग व्यक्त केला.
नेमकं काय घडलं?
पंढरपुरात सध्या आषाढी वारीची लगबग सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून शहरातील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या अतिक्रमणाविरोधातील कारवाई आणि शहरातील स्वच्छतागृहांबाबत पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ गाऱ्हाणे घेऊन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे गेले.
याभेटीदरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडताच निवडणूक निकालानं अस्वस्थ असलेले परिचारक म्हणाले, "द्या की मतं काँग्रेसला... आता जावा तिकडं... आता बघू काय-काय करताय."
परिचारकांनी दिलेल्या सल्लामुळे आपल्या समस्या घेऊन गेलेले व्यापारीही आवाक् झाले. त्यामुळे परिचारकांनी दिलेल्या सल्ल्याची पंढरपूर शहरातील बाजारपेठेत चर्चा रंगली होती.
दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना पंढरपूर-मंगळवेळा मतदारसंघातून 45 हजारांचे महाधिक्क्य मिळालं होते. या मतदारसंघात महायुतीकडे भाजपचे आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, अशी नेत्यांची तगडी फौज होती. याशिवाय सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवकांची संख्या वेगळी आहे. मात्र, बलाढ्य शक्ती पाठीशी असूनही राम सातपुते यांना ही मातब्बर नेतेमंडळी लीड देऊ शकली नाहीत.
प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून 6 लाख 20 हजार 225 तर, राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 मते मिळाली आहेत. पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रणिती शिंदे यांना 1 लाख 24 हजार 711 मते, तर सातपुते यांना 79 हजार 292 मते मिळाली आहेत. अर्थात पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून तब्बल 45 हजार 420 मतांचे मताधिक्क्य प्रणिती शिंदे यांना मिळालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.