Ahmednagar Political News : राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. यातच मुदत संपत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकाही वेळेतच होतील, अशी अटकळ सुरू झाली आहे. राज्यात राजकीय दृष्टीनं संवेदनशील असलेली अहमदनगर महापालिकेची मुदत डिसेंबर 2023 ला संपत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी महापालिका निवडणुकीबाबत मोठी भविष्यवाणी केली. राज्यात मुदत संपलेल्या महापालिकेच्या निवडणुका नियोजित वेळेत होणार नाहीत, तर तेथे प्रशासकामार्फत कामकाज होईल, असे अॅड. आगरकरांनी स्पष्ट केले आहे. (Latest Political News)
अहमदनगर महापालिका राजकीय दृष्टीनं राज्यात संवेदनशील आहे. त्यामुळे इथल्या महापालिकेतील घडामोडींवर राज्यातील नेत्यांचेदेखील लक्ष असते. अहमदनगर शहर तसा पाहिल्यास शिवसेनेचा बालेकिल्ला! राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रभाव अहमदनगर महापालिकेच्या राजकारणावर पडतो. अहमदनगर महापालिकेत ६८ नगरसेवक आहेत. अहमदनगरच्या महापालिकेत शिवसेना २३, राष्ट्रवादी १८, भाजप १५, काँग्रेस पाच, बसपा चार, सपा एक आणि अपक्ष दोन, असे सध्याला राजकीय बलाबल आहे.
स्थानिक पातळीवर शिवसेना-राष्ट्रवादीचे राजकीय पातळीवर विळ्या-भोपळ्याचा वैर! राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपची जोरदार तू-तू-मैं-मैं सुरू होती. याचा फायदा घेत राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला अन् भाजपला महापौर दिले. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी-भाजपची झालेली ही आघाडी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली. (Maharashtra Political News )
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, असे महाविकास आघाडी सरकार आले. यानंतर अहमदनगर महापालिकेचे महापौर पद महिलांच्या अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित झाले. राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताना दिसल्याने राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर आली. तसे ते राज्यातील नेत्यांनी सूचित केले होते.
शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे महापौर, तर राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले हे उपमहापौर झाले. आता महापालिकेची मुदत 30 डिसेंबरला संपत आहे. पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे. नवरात्र उत्सवानंतर पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे. यानंतर डिसेंबर सुरू होत आहे. निवडणुका होणार हे गृहीत धरून सणांच्या निमित्तानं नगरसेवकांनी गाठीभेटीवर आणि शुभेच्छांद्वारे प्रभागांमध्ये संपर्क सुरू केले आहे.
आता लोकसभा निवडणुकांवर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे राज्यात मुदत संपत असलेल्या महापालिकांच्या निवडणुका नियोजित वेळेत होतील की नाही, यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अहमदनगर शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी मुदत संपत असलेल्या महापालिकांचे कामकाज पुढील काळात प्रशासकामार्फत सुरू राहील, अशी भविष्यवाणी केली आहे. म्हणजेच, मतदारांना सुरुवातीला लोकसभा निवडणुकांना समोरे जावे लागेल. त्यानंतर विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असाही अंदाज अॅड. अभय आगरकर यांनी व्यक्त केलेला आहे. (Ahmednagar Politics)
'राज्यात मुदत संपलेल्या जिल्हा परिषदांवर सध्या प्रशासक आहेत. त्यात अहमदनगर जिल्हा परिषदेचा देखील समावेश आहे. तसेच राज्यात 300 हून अधिक पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषदांवर प्रशासक आहे. याशिवाय ओबीसी आरक्षणाच्या मुद्दाबराेबर प्रभाग रचनेवर प्रलंबित असलेली याचिका आहे. राज्यात सध्या राजकीय परिस्थिती अस्थिरतेची आहे', याकडे देखील अभय आगरकर यांनी लक्ष वेधले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.