Mumbai News: नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी तब्बल 24 रुग्ण दगावल्याची घटना समोर आली होती. या मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश होता. एवढंच नाही तर 24 रुग्णांच्या मृत्यूनंतर पुन्हा सात रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा आकडा 41 पर्यंत पोहाेचला. या घटनेने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. आता या प्रकरणी राज्य सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना फोन करत नांदेडमधील दुर्घटनेप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण घटनेप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जर या प्रकरणात अधिकारी दोषी आढळले तर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.
रुग्णालयातील स्वच्छतेसंदर्भात सरकार पावलं उचलणार ?
नांदेड रुग्णालयातील मृत्यूतांडवाने राज्यात खळबळ उडाल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता (डीन) यांना शौचालयाची स्वच्छता करायला लावली होती. त्यानंतर हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला. मात्र, या निमित्ताने रुग्णालयातील स्वच्छतेचा मुद्दा चर्चेत आला होता. आता रुग्णालयातील स्वच्छतेसंदर्भात सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत असून, लवकरच निर्णय घोषित होण्याची शक्यता आहे.
सुमोटो याचिकेवर सरकार उद्या उत्तर देणार ?
नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला या भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. यावर आता शुक्रवारी राज्य सरकारकडून नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणासंदर्भात उत्तर सादर करण्यात येणार आहे. तसेच या उत्तरात नांदेड दुर्घटनेत नेमके मृत्यू कशामुळे झाले, याबाबतची माहिती नमूद करण्यात येणार आहे.
10 मुलांच्या मृत्यूला खासगी हॉस्पिटल जबाबदार ?
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी 24 रुग्ण दगावले होते. यामध्ये 12 बालकांचा समावेश होता, पण यातील 10 बालकांच्या मृत्यूला खासगी हॉस्पिटल जबाबदार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कारण पाच दिवस सुट्या असल्यामुळे अत्यवस्थ लहान मुलांना सरकारी दवाखान्यात दाखल करायला खासगी हॉस्पिटलमध्ये सांगिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डॅाक्टरांच्या बदलीबाबत सरकार पावलं उचलणार ?
नांदेडच्या रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर अशीच घटना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही घडली होती. त्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. आता डाॅक्टरांच्या बदलीबाबत सरकार पावलं उचलणार असून, नांदेडमध्ये झालेल्या प्रकरणात चौकशी समितीच्या अहवालानंतर काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.