Satara Loksabha News : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपने यावेळेस विशेष लक्ष दिले असून, येथून भाजपचाच खासदार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी एक केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घातले आहे. या मतदारसंघात कमळ फुलविण्यासाठी शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादीची साथ त्यांना मिळणार का? हा प्रश्न आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघावर Satara loksabha आजपर्यंत राष्ट्रवादीचे NCP वर्चस्व राहिले आहे; पण मध्यंतरीच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर या मतदारसंघावर भाजपने BJP लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी तळातून बांधणी केली आहे. आता तर राष्ट्रवादीचा एक गट भाजप व शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाल्याने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात युतीतील घटक पक्षांच्या मदतीने आगामी लोकसभा निवडणूक सोपी करून जास्तीत जास्त जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने सातारा लोकसभा मतदारसंघांवर त्यांनी जास्तच लक्ष दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. २७) केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. केवळ सातारा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी हा त्यांचा दौरा आहे.
त्यानंतर चार ऑक्टोबरला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते प्रत्येक तीन विधानसभा मतदारसंघाची एकत्र बैठक घेणार आहेत. यातून कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघ ताब्यात घ्यायचा, हे भाजपचे मिशन आहे. यावेळी सातारा लोकसभेसाठी भाजपकडे खासदार उदयनराजे भोसले हेच उमेदवार असल्याचे मानले जात आहे.
सातारा लोकसभेसाठी भाजपची जय्यत तयारी सुरूअसून, त्यासाठी केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्यावर सातारा लोकसभेचा संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही या मतदारसंघावर लक्ष ठेऊन आहेत. भाजपने २०१९ नंतर सातारा लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग सुरू केले आहे. बूथ बांधणीवर अधिक लक्ष दिले आहे. प्रत्येक गावात संपर्क वाढवला आहे.
भाजपकडे दिग्गज नेते मंडळींची फळी आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अतुल भोसले, विक्रम पावसकर, माजी आमदार मदन भोसले, मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आदींचा समावेश आहे. यासोबत शिंदे गट शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची युती म्हणून भाजपला साथ मिळणार आहे. दुभंगलेल्या राष्ट्रवादीचा फायदा उठवत सातारा लोकसभा मतदारसंघात कमळ फुलविण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार का? याची उत्सुकता आहे.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.