

Jeur, 30 June : राज्य सरकारने गेल्या वर्षी एक रुपयातील पिक विमा योजना बंद करताना योजनेतील महत्वाचे चार ट्रिगर बदलण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला होता. गेली वर्षभरापासून विरोधी पक्ष, शेतकरी संघटना आणि शेतकरी त्याविरोधात आवाज उठवत होते. मात्र, आता अखेर सत्ताधारी पक्षाचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीच विधानसभेत आवाज उठवला आहे. आता भाजपचे सरकार आपल्याच आमदाराचे ऐकून शेतकरीहिताचा निर्णय घेणार का की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार, हे पाहावे लागेल.
एक रुपयात पीकविमा या योजनेत झालेल्या गैरव्यवहारानंतर राज्य सरकारने पीकविमा योजनेत बदल केले. एक रुपयात पीकविमा ही योजना बंद केली, तर पीकविमा योजनेत बदल करण्यात आले. यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पावसाभावी पेरणी झाली नाही तरी विमा मिळणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्चात नुकसान भरपाई हे चार ट्रीगर बदलण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
पीकविमा योजनेतील बदल हे शेतकऱ्यांच्या मुळावर आले असून त्यात बदल करण्यात यावेत, अशी मागणी विरोधी पक्ष, शेतकरी संघटना आणि शेतकरी करत आहेत. मात्र, सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आता त्यावर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीच विधानसभेत आवाज उठवला आहे.
आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळवून देणारे ‘पेरणी न होणे’, ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’, ‘स्थानिक नैसर्गिक आपत्ती’ आणि ‘काढणीनंतरचे नुकसान’ हे चार महत्त्वाचे निकष (ट्रिगर्स) राज्य सरकारने रद्द केले आहेत, त्यामुळे पीक विमा भरपाईच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. या निर्णयामुळे नुकसान होऊन शेतकरी विमा लाभापासून वंचित राहत असल्याची खंत कल्याणशेट्टी यांनी बोलून दाखवली.
बदलत्या हवामानाचा फटका, अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरते. मात्र, महत्त्वाचे निकष रद्द झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नसून त्यांच्या अडचणीत भर पडत आहे, असेही त्यांनी सांगितले.
बळीराजाला संकटाच्या काळात वाऱ्यावर न सोडता त्याच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी, यासाठी सरकारने रद्द केलेल पीकविमा योजनेतील चारही निकष तातडीने पूर्ववत करावेत. तसेच, नुकसानग्रस्त आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीकविमा तत्काळ मंजूर करून द्यावा, अशी आग्रहाची मागणी कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत बोलताना केली.
सत्ताधारी भाजप आमदाराने पीकविम्यातील चार ट्रिगरबाबत आवाज उठविल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते, याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.