
Karad, 07 April : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेलने विरोधकांचा २१-० असा धुव्वा उडविला. विधानसभेतील यशानंतर भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी सत्ताधाऱ्यांसमोर कडवे आव्हान उभे केले होते. मात्र, राजकीय गणित न जुळल्याने भाजप आमदार व जिल्हाध्यक्षांमध्ये फाटाफूट झाली आणि तिसरे पॅनेल पडले. अपेक्षा उंचावलेल्या असलेल्या निवडणुकीत झालेला मानहानीकारक पराभव भाजप जिल्हाध्यक्षांच्या जिव्हारी लागला असून त्यातूनच त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyasheel Kadam ) म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयसुध्दा सोपा होता. परंतु, अहंकारी नेतृत्व तसेच, काही लोकांना आमच्यामध्ये मेळ बसू द्यायचा नव्हता. त्यामुळे सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनेलच्या विरोधात दोन पॅनेल झाले. परिणामी सभासदांनी विद्यमान व्यवस्थापनाला स्वीकारले. त्यांचा निशाणा नेमका कोणावर आहे, असा चर्चा आता कराडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Sahyadri Sugar Factory elections) सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आम्ही सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो. तसेच, सह्याद्री कारखाना स्वतःचा नावलौकिक पुन्हा मिळवेल, अशी अपेक्षाही करतो. आम्ही चांगल्या आणि विधायक कामाला सत्ताधाऱ्यांना नक्की मदत करू. पण, ज्या ठिकाणी चुकीचे असेल, त्याला वेळप्रसंगी विरोधही करण्यात येईल, असा इशारा धैर्यशील कदम यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाची पाहणी करण्यासाठी आणि त्याबाबतची माहिती घेण्यासाठी कारखान्याचा सभासद म्हणून येत्या दहा-पंधरा दिवसांत मी स्वतः कारखाना कार्यस्थळावर जाणार आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील पराभव मान्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सह्याद्री साखर काखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. वैयक्तीक स्वार्थासाठी मी ही कारखान्याची निवडणूक लढवलेली नव्हती. शेतकरी, सभासदांना न्याय मिळावा, सभासद मालक म्हणून कारखान्यात राहावा, या प्रामाणिक भावनेतू (स्व.) यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेलो होतो.
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आम्ही खचून जाणार नाही. या उलट सभासदांच्या न्याय हक्कासाठी भविष्यातही अधिक तीव्रपणे लढत राहणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीत आमच्या सोबत राहणाऱ्या सभासदांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानतो, असेही आमदार घोरपडे यांनी स्पष्ट केले.