
Solapur, 31 January : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले म्हणून कारणे दाखवा नोटीस पाठविलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र पाठवून अभिनंदन केले आहे, त्यामुळे मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या विरोधकांना चकवा दिल्याचे मानले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली होती, त्यामुळे मोहिते पाटलांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माढ्यातून लोकसभा लढवली होती. त्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला होता. संपूर्ण लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil ) यांनी भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारापासून लांब हात राहिले होते.
दरम्यानच्या काळात त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला, असा आरोप झाला होता. विधानसभा निवडणुकीतनंतर तर माळशिरसमधून पराभूत झालेले राम सातपुते यांनी रणजितसिंह यांच्या विरोधात मोहिमच उघडली होती. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी सातपुते यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांकडे लावून धरली होती.
माजी आमदार सातपुते यांचा आाणि पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या शिफारशीनंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी नोटिशीला समर्पक उत्तर दिले होते. त्यामुळे वातावरण शांत होते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीत ताकद दाखवण्याची संधी रणजितसिंह मोहिते पाटील यांना मिळाली होती, ती संधी त्यांनी साधली आणि पक्षाला आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून सदस्य नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एक हजार सदस्यांनी नोंदणी केली आहे. त्या माध्यमातून मोहिते पाटील यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे, असे कौतुक बावनकुळे यांनी मोहिते पाटील यांचे केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रात काय म्हटले आहे?
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पाठवलेल्या पत्रात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या संघटनापर्वामध्ये आपण सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
भारतीय जनता पक्षाचे अंत्योदयाचे धोरण आपण जनमानसांत घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची मान जगभरात उंचावली आहे. आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आता थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.
संघटनपर्वात आपण एक हजार सदस्य भाजपसोबत जोडून आपण संघटना बळकट केली आहे. शिवाय महाराष्ट्र विकासासाठीचे दूतही आपणही जोडून घेतलेले आहेत. आपल्या या योगदानाबद्दल पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.