
Vidhan Parishad Election Politics in Kolhapur : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गटातून विधान परिषदेवर आमदार आहेत. मागील निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले. आता मात्र त्यांना फार कसरत करावी लागणार आहे. विधान परिषद निवडणुकीला वर्षाचा कालावधी असला तरी त्यांना निवडून येण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवण्यासाठी धडपडावे लागणार आहे.
इतकेच नव्हे तर काँग्रेसचे ताकद वाढवण्यासाठी ही प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील दहा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असल्याने आतापासूनच भाजपने खासकरून महायुतीने सतेज पाटलांची कोंडी करण्याचा प्लॅन आखल्याचे दिसत आहे. त्यात भाजप(BJP) किती यशस्वी होणार? हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नंतरच स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस(Congress) हा महाविकास आघाडीतील मोठा भाऊ ठरला. जागा वाटपात जिल्ह्यात काँग्रेसला पाच जागा दिल्या होत्या. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवारांची जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावरच टाकली होती, असे दिसून आले. त्यामुळे पाटील यांनी राधानगरी- भुदरगड, चंदगड, शिरोळ, हातकणंगले, करवीर, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात प्रचार दौरा सुरू ठेवला होता.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गटातून होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत या मतदारसंघातील पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या सदस्यांची मोठी मदत होते. मात्र मतदारसंघात काँग्रेसचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असल्याने मदत करणाऱ्यांविरोधातच सतेज पाटील(Satej patil) यांना प्रचार करावा लागला. त्यामुळे विद्यमान आमदारांना सोपी असलेली निवडणुक सतेज पाटील यांनी घेतलेल्या प्रचार दौऱ्यामुळे अवघड झाली. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत यांची मदत होणार का? हे भविष्य काळाचे ठरवणार आहे.
मागील महिन्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शिरोळमध्ये जाऊन विधान परिषदेचा चेहराच घोषित केला. शिरोळ तालुक्यातून सर्वाधिक मतदान आहे. विधानसभा मतदारसंघातील महायुतीला पाठिंबा दिलेला चेहरा महायुतीसमोर आणण्याचे संकेत आहेत. सावकार मादनाईक यांना राजेंद्र पाटील यड्रावकर देखील पुढे आणू शकतात. तर पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघातून देखील महायुती देईल त्या उमेदवाराच्या मागे राहण्यास आमदार विनय कोरे यांची भूमिका राहील. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत राजाराम छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा शब्द न पाळल्याने कोरे यांच्या मनात सतेज पाटील यांच्या बाबत खदखद आहे. याचा फटका देखील भविष्यकाळात बसू शकतो का? हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
शिवाय, दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना, खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापुरात उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली. त्यावरून देखील राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनाच निशाण्यावर घेतले. एकंदरीत पाहता विधानसभा निवडणुकीत महायुतीने दहापैकी दहा जागा मिळवल्यानंतर विरोधकच शिल्लक नाहीत अशी परिस्थिती आहे.
मात्र आगामी काळात विरोधक शिल्लकच राहू नये या दृष्टीने भाजपने आमदार सतेज पाटील यांना घेरण्याचा डाव आखल्याचे दिसते. शिवाय उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या काळात काही प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विरोधक साफ होतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात कोणाच्या भाजपमध्ये जाण्याने विरोधक साफ होणार हे पक्षप्रवेशावरच ठरणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.