
APMC News : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीसाठी भाजपने केलेली खेळी अखेर आज यशस्वी ठरली. सभापतिपदी भाजपचे ब्रह्मदेव पुकळे यांची निवड झाली. राष्ट्रवादीच्या बाळासाहेब काळे यांचा फक्त एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे संचालक किसन सावंत अनुपस्थित राहिल्याने भाजपला विजय सोपा झाला.
भाजपचे सभापती विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिल्याने नवीन सभापती निवडी 13 ऑक्टोबरसाठी सभा आयोजित करण्यात आली होती. पण या सभापती निवडीत अनपेक्षितपणे ‘हायव्होल्टेज ड्रामा’ बघायला मिळाला. राष्ट्रवादीने रासपचे रमेश यादव यांना आपल्या गोटात आणत बलाबल नऊ- नऊ असे समसमान केले. राष्ट्रवादीचे नऊ सदस्य उपस्थित राहिले. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला.
भाजपने यातून सावरत सभापती निवडीच्या बैठकीवेळी आधार घेत खेळी केली. मात्र, भाजपने आपले नऊ सदस्य अनुपस्थित ठेवले. परिणामी गणपूर्ती न झाल्याने सभा तहकूब करून पुढे ढकलण्यात आली. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीने कोल्हापूर खंडपीठात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. इथेच भाजपने जिंकण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले. तहकूब करण्यात आलेली सभा रविवारी (१९ ऑक्टोबर) घेण्यात आली.
अध्यासी अधिकारी धनाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला भाजपचे ब्रह्मदेव पुकळे, विलासराव देशमुख, वैशाली वीरकर, अर्जुन बनगर, दत्तात्रय सत्रे, निर्मला जाधव, रवींद्र तुपे, शेखर गांधी व अमोल राऊत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कुंडलिक भोसले, बाळासाहेब काळे, योगेश भोसले, सूर्याजीराव जगदाळे, रमेश यादव, रामचंद्र कदम, रामचंद्र झिमल, पंजाबराव पोळ उपस्थित होते.
त्याचवेळी राष्ट्रवादीचे किसन सावंत अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीने निकाल काय होणार? हे स्पष्ट झाले होते. भाजपकडून ब्रह्मदेव पुकळे, तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब काळे यांनी सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. मतमोजणीत ब्रह्मदेव पुकळे यांना नऊ, तर बाळासाहेब काळे यांना आठ मते मिळाली. त्यामुळे ब्रह्मदेव पुकळे यांचा एका मताने विजय झाला.
निकालानंतर भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे, संजय गांधी, शिवाजीराव शिंदे, गणेश सत्रे, राजू पोळ, हरिभाऊ जगदाळे, अप्पासाहेब पुकळे, लुनेश वीरकर, अॅड. दत्तात्रय हांगे, बालाजी जगदाळे, कैलास दडस, सचिन पुकळे आदी मान्यवर उपस्थित होते. ब्रह्मदेव पुकळे यांचा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे व सोनिया गोरे यांनी सत्कार केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.