संदीप शिरगुप्पे
Kolhapur News : जिल्हा परिषद निवडणुकीत अनुसूचित प्रवर्गातून निवडून आलेले पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याची नोंद ऑनलाईन पोर्टलवर करण्यात आली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर येथे झालेल्या अंतिम सुनावणीनंतर हा निर्णय नोंदविण्यात आला असून निकालाची अधिकृत प्रत टपालाद्वारे पाठविण्यात येणार आहे.
या प्रकरणाची अंतिम सुनावणी ३ जून रोजी झाली होती. तब्बल पाच तास चाललेल्या सुनावणीनंतर समितीने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर निकाल प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये महेश पाटील यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे.
महेश पाटील हे लिंगायत समाजाचे असताना त्यांनी लिंगडेर या अनुसूचित प्रवर्गातील जातीचा दाखला सादर केल्याचा आक्षेप पुरुषोत्तम भुजिंगे आणि तुषार बाणदार यांनी घेतला होता. जातवैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या अर्जाविरोधात हरकत नोंदवत समितीसमोर विविध कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले. संबंधित दाखला खोटा असल्याचा दावा करीत हरकतदारांच्या वकिलांनी सविस्तर युक्तिवाद केला.
हरकतदारांच्या वतीने अॅड. सुनील कांबळे, अॅड. भिमसेन कांबळे, शरद शिंदे, प्रशांत कांबळे, प्रमोद दाभाडे, संदेश कांबळे, किरण कांबळे, राहुलराज कांबळे, प्रविण कांबळे आणि महेश कांबळे यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर समितीने निकाल राखून ठेवला होता.
हरकतदार वकील भिमसेन कांबळे म्हणाले, "या प्रकरणातील अंतिम सुनावणी तब्बल पाच तास चालली. आम्ही आमची बाजू पूर्णपणे आणि सर्व कागदोपत्री पुराव्यांसह समितीसमोर मांडली. समितीने सर्व संबंधितांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतले. सुनावणीनंतर निकाल राखून ठेवण्यात आला असून निकालाची प्रत टपालाद्वारे पाठविण्यात येणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे.
महेश उर्फ दरगोंडा पाटील म्हणाल्या, निकालाची मूळ प्रत माझ्या हातात आली नाही. बार्टीच्या वेबसाईटवर प्रमाणपत्र अवैद्य म्हणून दिसत आहे. परंतु मला अद्याप मेल किंवा मूळ प्रत हातात आली नाही. निकाल लागला असेल तर तो दबावापोटी निर्णय घेतला आहे.
महेश पाटील यांनी लिंगडेर जातीचा अनुसूचित प्रवर्गातील बोगस दाखला सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल समोर येताच पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील पट्टणकोडोली, चंदूर व इंगळी परिसरात काही तरुणांनी गुलालाची उधळण करत व वाहनांच्या फेऱ्या काढून आनंदोत्सव साजरा केला. ‘‘संविधान जिंकले’’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच या निर्णयाची दिवसभर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.