सातारा : लोकांत भांडणे लावून सत्तेची मलई खायचे काम भाजप करत आहे. त्यांचे हिंदूत्व ढोंगी असून संत परंपरेला नख लावण्याचे काम भाजप करत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आरएसएसचे योगदान नव्हते. ते इंग्रजांना साथ देत होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी साताऱ्यात केला आहे. दरम्यान, भाजपने मताला एक लाख रुपये दिले तरी बारामती राष्ट्रवादीमुक्त होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी महिला पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने आयोजित मुलाखतींसाठी विद्याताई चव्हाण साताऱ्यात आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विद्याताई म्हणाल्या, महिला जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करायची आहे. समाजकारण करणाऱ्या अनेक महिला राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. त्यांच्यातून सक्षम व पक्षासाठी वेळ देणाऱ्या महिलेलाच या पदावर संधी दिली जाईल.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह सर्वच निवडणुकीत भाजप पैशांचे वाटप करीत आहे. संभाव्य मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पैसे वाटण्याची तयारी भाजपने केली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताला तीन हजारांचा भाव काढला होता हा धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे पारदर्शक कारभारासाठी राज्यातील मतदारानेच मतदार विकणार नाही, ही भूमिका ठेवली पाहिजे.
भाजपच्या अमेठी, बारामती मिशनविषयी त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे तेथे मोठे योगदान आहे. तेथे पंतप्रधान मोदी निवडणुकीला उभे राहिले तरी काही फरक पडणार नाही. त्यांनी मताला एक लाख रुपये दिले तरी बारामती राष्ट्रवादीमुक्त होऊ शकत नाही.
त्या म्हणाल्या, आज देशात महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे असून त्या विरोधात महिला राष्ट्रवादीतर्फे लवरकच राज्यभर जिल्हास्तरीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपकडून सध्या सातत्याने गांधी घराण्याचा अनादर केला जात आहे. शालेय पाठ्यपुस्तकांत गांधी घराण्यातील नेत्यांबद्दल आक्षेपार्य लेखन केले जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असणाऱ्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भाजपचे ढोंगी हिंदुत्व समाजावर बिंबवण्याचे काम करत महागाई व बेरोजगारी मुद्द्यावरून नागरिकांचे लक्ष हटवण्याचे काम सुरू आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.