

भाजपची योजना धुळीस मिळण्याची शक्यता:
मलकापूर नगरपालिकेत शतप्रतिशत सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्लॅन, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोडीत काढण्याची तयारी सुरू आहे.
समविचारी पक्षांची एकत्रित रणनीती:
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तसेच भाजपमधील नाराज गट एकत्र येऊन भाजपविरोधात आघाडी करण्याची शक्यता.
राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल:
आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे भाजप बळकट झाली असताना, शिंदे यांच्या प्रवेशामुळे निर्माण झालेल्या नाराजीचा राष्ट्रवादी प्रभावीपणे फायदा घेत आहे, ज्यामुळे BJP साठी निवडणूक कठीण होऊ शकते.
Karad, 14 November : नगरपालिका निवडणुकीत शतप्रतिशत भाजप करण्याचा विडा राज्यातील पक्षनेत्यांनी उचलला आहे. त्यातून राज्यातील बहुतांश नगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने अनेक दिग्गजांना पक्षात घेतले. मात्र, भाजपच्या या महत्वकांक्षेला सुरुंग लावण्याचे काम महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरु आहे.
भाजपविरोधातील (BJP) सर्व समविचारींना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कालच्या बैठकीत केला. त्यामुळे आता भाजपविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या गोटातील काही नाराजही त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी भाजपला एकतर्फी वाटणारी मलकापूर नगरपालिकेची निवडणूक अन्य पक्षांच्या माध्यामातून लढवली गेल्यावर भाजपपुढे मोठे आव्हानच असणार आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांच्या माध्यमातून माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मलकापूर शहराची घडी बसवली. शहरात पहिल्यांदाच राबवण्यात आलेली २४ बाय ७ पाणी योजना देशात आदर्शवत ठरली. त्या शहराची ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपालिका अशा प्रवासात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा मोठा हातभार होता. त्यांच्या माध्यमातून माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांनी शहरात विविध योजना राबवल्या.
मध्यंतरीच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करुन भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले हे विजयी झाले. त्यानंतर आमदार डॉ. भोसले यांनी मलकापूरमध्ये आपले वर्चस्व वाढविण्यास प्रारंभ केला. त्यांनी पहिल्याच टप्यात माजी मुख्यमंत्री चव्हाण आणि माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांचे कट्टर असलेले माजी नगरसेवक राजेंद्र यादव यांना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये घेतले.
आमदार डॉ. भोसले यांनी टप्याटप्याने मलकापुरमधील अनेकांना पक्षात घेत थेट माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांनाच त्यांनी गळाला लावले. मध्यंतरी मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ते भाजपमध्ये जात असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपने मलकापूरमध्ये एकहाती सत्ता येईल, या दृष्टीने पावले टाकली होती.
मात्र, शिंदे हे भाजपमध्ये गेल्याने मलकापूरमधील काहीजण नाराज झाले आहेत. त्याचा फायदा उठवत भाजपच्या एकहाती सत्तेच्या मास्टर प्लॅनला सुरुंग लावण्याचे काम महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरु करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यासाठी खासदार नितीन पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील वाठारकर, राष्ट्रवादी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मलकापूरची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना माननारा मलकापूरमधील कॉंग्रेसचा गटही यावेळी राष्ट्रवादीसोबत राहील, अशी स्थिती आहे. त्यामुळे आता भाजपविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या गोटातील काही नाराजही त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी भाजपला एकतर्फी वाटणारी मलकापूर नगरपालिकेची निवडणूक अन्य पक्षांच्या माध्यामातून लढवली गेल्यावर भाजपपुढे ते आव्हानच असणार आहे.
Q1: मलकापूरमध्ये भाजपविरोधात कोणते पक्ष एकत्र येऊ शकतात?
A1: राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) आणि भाजपचे नाराज कार्यकर्ते.
Q2: भाजपची सध्याची रणनीती काय होती?
A2: मलकापूर नगरपालिका शतप्रतिशत भाजप करण्याची आणि स्वबळावर सत्ता ठेवण्याची योजना होती.
Q3: राष्ट्रवादी काँग्रेसने काय पावले उचलली?
A3: समविचारी पक्षांची बैठक घेऊन एकत्रित आघाडीची घोषणा केली.
Q4: मलकापूरची निवडणूक भाजपसाठी का कठीण झाली?
A4: शिंदे यांच्या प्रवेशानंतर झालेली नाराजी आणि आता विरोधी पक्षांच्या एकत्रित आघाडीमुळे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.