Nagar Politics : केंद्र सरकारने एका रात्रीत आदेश काढून कांदा उत्पादक शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवायला तयार नाहीत. मात्र शेतकरी आता गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांनी पण आता जो पर्यंत 40 टक्के लावलेला निर्यात कर केंद्र सरकार रद्द करत नाही. तो पर्यंत बाजार समितीत कांदा विक्रीला आणू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले आहे.
आज(20 ऑगस्ट) राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.
कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने अचानक घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाल्याचे चित्र ठिकठिकाणी आज पाहायला मिळाले. राहुरीमध्ये स्वाभिमानीच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
अतिरिक्त कांदा उत्पादनाने काही दिवसांपूर्वी भाव कोसळले होते. त्यानंतर अतिवृष्टी मुळे चाळीत साठवलेला कांदा खराब झाला. शासनाने या नुकसानीत शेतकऱ्याला कसलीही मदत केली नाही. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला थोडा भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने अचानक थेट 40 टक्के निर्यात कर लावला. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच जो पर्यंत निर्यात कर रद्द केला जात नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी बाजारात कांदा विकण्यास आणू नये असे आवाहन करण्यात आले.
यावेळी रवींद्र मोरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे सुनील इंगळे, सतीश पावर, विजुभाऊ डवले, जुगलकुमार गोसावी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारच्या या मनमानी, शहरी धार्जिणे आणि शेतकरी विरोधी धोरणा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.