पिंपरी : अजित पवार यांनी `जरंडेश्वर` संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती काल (ता.२२) दिली. तरी या साखर कारखान्याचे कवित्व संपायचे नाव काय घेत नाही. काळा पैसा या कारखान्यात आणून तो पांढरा केला गेला. त्यासाठी तो फेक कंपन्यांमार्फत कारखान्यात आणला गेला, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता.२३) केला. म्हणून हा कारखाना`ईडी` फेऱ्यात अडकला असून त्याची चौकशी सुरु आहे, असे ही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवडमधील रावेत येथे एका खासगी कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरंडेश्वरसह ६४ कारखानेही विकण्यात आले असल्याचे श्री. पवार यांनी काल सांगितले. मात्र, लक्ष फक्त जरंडेश्वरवर दिले जात आहे. त्याचीच चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, जरंडेश्वर आणि विकलेल्या ६३ बाकीच्या कारखान्यांत फरक आहे. तो समजून घ्या. जरंडेश्वर वगळता बाकीचे ६३ कारखाने कमी किमतीत विकले गेले आहेत. तर, जरंडेश्वरमध्ये काळा पैसा हा पांढरा करण्यात आला आहे. त्यासाठी तो बोगस कंपन्यांव्दारे कारखान्यात आणण्यात आला आहे.
तसेच फक्त जरंडेश्वरचीच चौकशी करा, असे आमचे म्हणणे नाही. सगळ्यांचीच करा आम्ही कुठे अडवलंय, पण जरंडेश्वर आणि इतर ६३ कारखान्यांत फरक आहे, हे ध्यानात घ्या. जरंडेश्वर 'ईडी'च्या रडारवर आहे. कारण तेथे मनी लॉंड्रिग झालं आहे. जेथे ते होतं, तेथे ईडीची चौकशी लागते. इतर कारखान्यातही जरंडेश्वरसारखे मनी लॉंड्रिंग झालं असेल, तर त्यांचीही चौकशी करा. पण, ते कमी किमतीत विकले म्हणून राज्य सहकारी बॅंकेची चौकशी केली पाहिजे. या बॅंकेचे संचालक म्हणून अजित पवार यांची केली पाहिजे, असे ते म्हणाले.
दरम्यान, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि राज्य सरकारला शाहरूखखानच्या मुलाला एवढा पुळका का असा समान्य नागरिक म्हणून मला प्रश्न पडलाय, असे पाटील यावेळी म्हणाले. मलिक दररोज यासंदर्भात काहींना काही वक्तव्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन याच्याविरुद्ध एनसीबीने केलेल्या कारवाईविरोधात, तर आर्यनच्या समर्थनार्थ करीत आहेत. दुसरीकडे राज्यात रोज चार महिलांवर अत्याचार होतेय. त्यावर सरकार काही तत्परतेने करीत नाही. मग, आर्यनला जामीन मिळत नाही म्हणून एवढं तडफडण्याचे कारण काय? का बाकी काही काम नाही. सगळे प्रश्न संपलेत, असे ते कडवटपणे म्हणाले.
मनसे व संभाजी ब्रिगेडशी भाजपची युती होण्याची सुतराम शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी या दोघांची विचारसरणी जुळत नसल्याचे कारण त्यांनी दिले. त्यातही परप्रांतीयांबाबतची मनसेची भूमिका भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी रा. स्व.संघ तथा आरएसएस हा भाजपला कंट्रोल करत नाही, पण आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतो, हे त्यांनी मान्य केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.