
Kolhapur News: महायुती सरकारचा महत्त्वाचा समजला जाणारा शक्तीपीठ महामार्गाच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्याला ग्रीन सिग्नल दिल्याने काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या विरोधामुळे कोल्हापूर जिल्हा पुरत्या शक्तिपीठ महामार्गाचा अध्यादेश रद्द करण्यात आला होता. मात्र निवडणूक संपताच शक्तीपिठाच्या कामाला पुन्हा गती आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय उद्रेक होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना हाताशी धरून अनेक नेते रस्त्यावर उतरण्याची तयारी करीत आहेत.
प्रस्तावित महामार्गद्वारे राज्यातील 12 जिल्ह्यातील 19 देवस्थान जोडली जाणार आहेत. वर्धा जिल्ह्यातून पवनार येथून या महामार्गाला सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे या महामार्गाचा शेवट होणार आहे. या महामार्गासाठी एकूण शेतकऱ्यांची 9385 तर वन विभागाची 265 हेक्टर जमीन भूसंपादन केली जाणार आहे.
या महामार्गासाठी एकूण 86 हजार 300 कोटी इतका निधी खर्च होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि नेत्यांचा या महामार्गाला तीव्र विरोध होत असल्याची लक्षात येताच महायुती सरकारने हा शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आले. त्याबाबतचे राजपत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर केले. शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची आंदोलन,निदर्शने लक्षात घेता हा महामार्ग रद्द केला.
विधानसभा निवडणुकी संपताच पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला गती आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुन्हा एकदा पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला मंजुरी दिल्याने पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात उद्रेक पाहायला मिळत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वारंवार स्पष्टीकरण देऊन सुद्धा स्थानिक नेत्यांनी समाज माध्यमांवरून विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे.
'रद्द’च्या आश्वासनाला महायुतीने हरताळ फासला आहे का ?
शक्तीपीठ महामार्गासंदर्भात माध्यमांमध्ये झळकणाऱ्या या बातम्या खऱ्या आहेत का ? निवडणूकीच्या तोंडावर शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. सत्तेवर येताच आपल्या आश्वासनांना सरकारने हरताळ फासला आहे का ? याचा खुलासा सरकारने करणे गरजेचं आहे. येत्या आठ दिवसांत सरकारने यासंदर्भातील आपले स्पष्टीकरण द्यावं. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.