Satara News : महाविकास आघाडी स्वार्थासाठी झालेली आघाडी असून त्यांच्यात काहीही केले तरी बिघाडी होणारच आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्याऐवजी विरोधी पक्षनेता ठरवावा कारण त्यांचा पराभव अटळ आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीला लगावला.
विधानसभेचे बिगुल वाजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीत यश मिळण्याचे साकडे घालण्यासाठी आपल्या दरे येथील ग्रामदैवताच्या दर्शनासाठी तातडीने रात्री अडीच वाजता दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. सायंकाळी मुंबईला रवाना होण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले हेलिकॉप्टरने उड्डाण केले मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुन्हा दरे येथे उतरावावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोटारीने मुनावळे , मेढा मार्गे मुंबईला कूच केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची दरे येथील आपल्या ग्रामदैवतावर अपार श्रद्धा असून निवडणुकीत यश मिळावे, अशी साकडे घालण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे रात्री अडीच वाजता दरे येथे दाखल झाले. चंदिगड येथे मुख्यमंत्र्यांची परिषद उरकून रात्री बारा वाजता पुणे येथे आले होते. तेथून मोटारीने ते दरे गावी दाखल झाले. सकाळी ग्रामदैवत उत्तर पद्मावती देवी, जननी माता यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दर्शन घेतले. गाईंच्या गोठ्यात जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी गोठ्याची पाहणी केली व गाईंना चारा घातला.
दरम्यान, पत्रकारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, अशी मागणी मी देवाजवळ केली आहे. महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सर्वसामान्य जनतेसाठी महायुती सरकारने अनेक योजना आणल्या मागच्या सरकारची आणि आमची तुलना केली तर महायुतीचं सरकारची सरस कामगिरी झाली आहे. याची पोचपावती म्हणून महाराष्ट्राची जनता या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देईल, असेही त्यांनी सांगितले.
आमचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असून उमेदवारांच्या बाबतीत जिंकणे हाच निकष ठेवला आहे. आमच्यात कोणताही वाद नसून निवडणुका आल्या की बंडखोरी वगैरे अशा गोष्टी होतात. मात्र महायुती समन्वयाने लढेल, मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्याऐवजी विरोधी पक्षनेता ठरवावा कारण त्यांचा पराभव अटळ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारासाठी मेढा येथील मानकुमरे पाॅंइटवर जावलीतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. मुंबईला जाताना मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा मेढा मार्गे जाताना. वसंतगडावर जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे, प्रतापगड साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे आदींनी मुख्यमंत्र्याचा ताफा अडवत त्यांचे रस्त्यावरच जंगी स्वागत केले. स्वागताचा स्विकार करत मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले.
खराब हवामानामुळे उतरावे लागले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर
सायंकाळी मुंबईला रवाना होण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले हेलिकॉप्टरने उड्डाण सुद्धा केले मात्र ढगाळ आणि खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा दरे येथे उतरावे लागले. शेवटी मुख्यमंत्री शिंदे हे मोटारीने मुनावळे मेढा मार्गे मुंबईकडे रवाना झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.