Satara Congress News : सातारा लोकसभा मतदार संघावर महायुतीमधील तिन्ही पक्ष दावा करत असून त्यांच्यामध्ये या मतदारसंघासाठी जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडीमधून जाहीरपणे कोणीही बोलताना दिसत नाही.
मात्र, आघाडीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली असल्याची माहिती काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली आहे.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. महाविकास आघाडीत तुम्ही सातारा मतदारसंघ लढविणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर नरेश देसाई यांनी साताऱ्यात आघाडीची बैठक झाली. त्यावेळी पृश्वीराज चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे सांगितले. तसेच आघाडीत उमेदवारीबाबत काय निर्णय होईल, त्याच्याशीही आम्ही प्रामाणिक राहू, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीत काॅंग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) आहे. सातारा लोकसभा मतदार संघावर 1999 पासून राष्ट्रवादीचा झेंडा असून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील(Srinivas Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्याचे आणि त्याचे चिरंजीव सारंग पाटील यांचे नाव चर्चेत आहे. अशावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आल्याने काॅंग्रेसही लोकसभेसाठी शड्डू ठोकला असल्याचे सध्या तरी दिसत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे गटाकडून खुद्द उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनीच यापूर्वीच लोकसभेला श्रीनिवास पाटील यांचे काम करा असा मातोश्रीवरून आदेश दिला आहे. तेव्हा आता महाविकास आघाडीकडून काॅंग्रेस की राष्ट्रवादीचा उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल अजून वाजला नसला तरी शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव, राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) खासदार श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील तयारीला लागले आहेत. तर भाजपाकडून माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) खुद्द अजित पवारांनी सातारा लोकसभेवर दावा केला आहे. मात्र, उमेदवारीबाबत वाच्यता केलेली नाही. अशावेळी शांत असलेल्या काॅंग्रेसकडून लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाणांसाठी उमेदवारी मागितल्याने महाविकास आघाडीत पर्याय उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. तसेच आता महायुतीनंतर महाविकास आघाडीतही उमेदवारांची नावे समोर येवू लागली आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.