Paschim Maharashtra News : पुणे येथे मुंबई न्यायालयाचे खंडपीठ व्हावे अशी मागणी करणारा ठराव डॉ. विश्वजीत कदम यांनी आणला आहे. विधानसभेच्या पटलावर हा ठराव मांडला नसला तरी त्यांचा हा ठराव म्हणजे कोल्हापूर सह पाच जिल्ह्यातील वकिलांच्या भावना दुखावणारा आहे. गेली 30 ते 35 वर्ष कोल्हापूरात खंडपीठ होण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांचा संघर्ष सुरू आहे. अनेक गोष्टीतून खंडपीठासाठी संघर्ष सुरू असताना सांगली जिल्ह्यातील पलूस मतदारसंघातील आमदार विश्वजीत कदम यांचा कोल्हापूर जिल्ह्यात खंडपीठ होण्याला विरोध आहे की काय? असे एका ठरावावरून समोर आले आहे.
पुणे येथे मुंबई न्यायालयाचे खंडपीठ व्हावे अशी मागणी करणारा ठराव डॉ. विश्वजीत कदम यांनी आणला आहे. विधानसभेच्या पटलावर हा ठराव मांडला नसला तरी त्यांचा हा ठराव म्हणजे कोल्हापूर सह पाच जिल्ह्यातील वकिलांच्या भावना दुखावणारा आहे. विश्वजीत कदम यांनी कोणत्या उद्देशातून हा ठराव मांडला आहे? हे स्पष्ट होत नसताना गेल्या 30 ते 35 वर्षापासून सुरू असलेल्या चळवळीला छेद देण्याचे काम सुरु आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे यासाठी जवळपास चार दशके संघर्ष सुरू आहे. या ठिकाणीच खंडपीठ होण्यासाठी गेले अनेक वर्ष विविध मार्गाने संघर्ष सुरू आहे. अनेक शासकीय-प्रशासकीय आणि संघटनात्मक बैठकीत मुंबई पातळीपर्यंत झालेले आहेत. महाविकास आघाडी सरकार काळापासून, युती, महायुती सरकारसोबत कोल्हापूर खंडपीठाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची ही चित्र आहे. मात्र डॉ. विश्वजित कदम यांनी मांडलेला ठराव चर्चेला आला नसला तरी विधानसभेत असा ठराव मांडणे हे या लढ्याला व चळवळीला मागे नेणारे आहे.
आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी मांडलेला विधि न्याय खात्यांतर्गतचा 117 क्रमांकाचा हा अशासकीय ठराव. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यातील जनतेच्या सोयीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ पुणे येथे स्थापन करा, अशी शिफारस ही विधानसभा शासनास करत आहे, असे या ठरावात म्हटले आहे.
दरम्यान, आज पाच जिल्हातील वकिलांची कोल्हापुरात बैठक होत आहे. त्यावरून आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून भौगोलिक दृष्ट्या कोल्हापुरात खंडपीठ होण्यास सर्वांचे एकमत होते. तर पुण्यात भाजपच्या आमदारांनी पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे अशी मागणी जोर लावून धरली होती. यावादातच कोल्हापुरातील खंडपीठाचा प्रश्न प्रलंबित आहे. असे असताना डॉ. विश्वजीत कदम यांच्या डोक्यात पुणे येथे न्यायालयाचे खंडपीठ होण्याचे फॅड कुठून आले? असा सवाल उपस्थित होत आहे.