सोलापूर : राज्यातील ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांवर (district bank) प्रशासकीय मंडळ अथवा प्रशासक नेमण्यात आलेला आहे. त्या बॅंकांसंदर्भात राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे (MLA Atul Save) आठवडाभरात महत्वपूर्ण निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या आठवड्यात भेटून प्रशासक असणाऱ्या सहा जिल्हा बॅंकांच्या निवडणुकीसंदर्भात बोलणार आहे. त्या भेटीनंतरच सोलापूरसह (Solapur) राज्यातील सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असे सहकार मंत्री सावे यांनी जाहीर केले. (Cooperative Minister will take decision in the week regarding election of six district banks including Solapur)
सध्या नाशिक, नागपूर, सोलापूर, वर्धा, बीड, बुलडाणा या राज्यातील सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांवर प्रशासक/प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. सोलापूर जिल्हा बॅंकेचे प्रशासक तथा राज्याचे अतिरिक्त निबंधक शैलश कोतमिरे यांची जिल्हा बॅंकेच्या प्रशासकपदाची मुदत ३१ डिसेंबरला पूर्ण होत आहे. या मुदतीनंतर बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घ्यायची असेल, तर आतापासूनच किमान ठराव घेण्याची आवश्यकता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ८० टक्के विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. ठरावाची प्रक्रिया सुरू झाल्यास पूर्ण होण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ठराव आणि मतदार यादीत न्यायालयीन बाबी झाल्यास हा कालावधी वाढण्याचीही शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा बॅंकेवर प्रशासक येऊन आता जवळपास चार वर्षांहून अधिकचा कालावधी झालेला आहे. महाविकास आघाडी सरकार या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत फारसे उत्सुक दिसत होते. राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर आल्याने या बॅंकेची निवडणूक आता होऊ शकते, याचा अंदाज बॅंकेच्या माजी संचालकांना आला आहे. त्यामुळे बॅंकेची निवडणूक आता घ्यावी या मागणीसाठी माजी संचालकांनीही राज्य पातळीवरून प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे नव्या वर्षात काय होणार? प्रशासक कायम राहणार की संचालक येणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांनी सोलापूरसह राज्यातील सहा जिल्हा बॅंकांची निवडणूक घेण्या संदर्भात संकेत दिले आहेत. नव्या वर्षात बॅंकेचे कारभारी कोण असणार? याचे चित्र या आठवड्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.