मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमच्या वादात मध्यस्थी केली, त्याबद्दल आभार. पण, माझ्यासाठी कार्यकर्ते आणि जनता महत्वाची आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. आज संध्याकाळी आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून उद्या आमच्या पक्षाचा जाहीर मेळावा आहे. त्यानंतर आम्ही उद्या आमची भूमिका स्पष्ट करू, असे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी जाहीर केले. (Activists are important to me; I Will discuss with them will announce role tomorrow : Bacchu Kadu)
आमदार रवि राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर पन्नास खोक्यांच्या अनुषंगाने आरोप केले होते. त्यावर कडू यांनी राणा यांना पुरावे देण्याचे आव्हान दिले होते. पुरावे न दिल्यास अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप वाढत दोघांमधील वाद पराकोटीला गेला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रवि राणार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावर बच्चू कडू बोलत होते.
माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, माझा आत्माच कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेत नाही. आज संध्याकाळी आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहोत. तसेच, उद्या आमच्या पक्षाचा जाहीर मेळावा आहे. पुराव्यासाठी आम्ही बसणार होतो. राज्यातील सर्व कार्यकर्ते येणार आहेत. तिथं आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.
हा वाद व्हायला नको होता. मी काही मुद्दामहून केलेले नाही. मात्र, जे काही आरोप केले आहेत, ते आमदार रवी राणा यांनीच माझ्यावर केले आहेत. आमदार राणांच्या आरोपावर मी गप्प बसलो असतो तर लोकांनी मला बदनाम केले असते. त्यामुळे मी राणांच्या आरोपाला उत्तर दिलं. ते योग्य की अयोग्य मला माहिती नाही, असेही बच्चू कडू यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, व्यक्तीगत आरोपामध्ये शक्ती वाया घालविण्यापेक्षा सार्वजनिक कामांसाठी ते कशी लावता येईल, याचा प्रयत्न व्हायला हवा. अशा वादामुळे मुख्य गोष्टी बाजूला राहिल्या आणि या वादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लक्ष केंद्रीत करावं लागलं. ते मलाही न पटणारं आहे. पण माझ्या अस्तित्वाचा विषय होता. आरोपच असे झाले होते की माझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे चळवळीतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आयुष्य या कारणांमुळे बरबाद होणार असेल तर त्याविरोधात आवाज उठवणंही महत्वाचं आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यासोबत काय बोलले, ते मी कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे, त्यानुसार कार्यकर्ते काय म्हणतात, हे पाहून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा काही मला फोन आला नव्हता. यासंदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.