सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ६ व ७ ऑक्टोबरला मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला. माढा (Madha) आणि करमाळा (Karmala) या दोन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून या दोन तालुक्यांतील दहा महसूल मंडलातील ८१ गावांमधील १० हजार ५७८ शेतकऱ्यांची ७ हजार ८८७ हेक्टरवरील पीक बाधित झाल्याचा अहवाल आज (ता. ८ ऑक्टोबर) जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. (Damage to crops on 7 thousand 887 hectares in Madha, Karmala due to heavy rains)
माढा तालुक्यातील सहा महसूल मंडळातील ६५ गावांमधील १० हजार १४६ शेतकऱ्यांची ७ हजार ५७१ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये २ हजार २३० हेक्टर जिरायत, ४ हजार ५३७ हेक्टर बागायती आणि ८०४ हेक्टर फळ पिकांचा समावेश आहे. करमाळा तालुक्यातील चार महसूल मंडलातील १६ गावे बाधित झाली असून ४३२ शेतकऱ्यांचे ३१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये जिरायतचे २४७ हेक्टर, बागायतीचे ६५ हेक्टर व ४ हेक्टरवरील फळपीकांचा समावेश आहे.
माढा तालुक्यातील चौभे पिंपरी व जाखले येथील पाझर तलाव फुटल्याने शेती पिकाचे नुकसान झाले आहे. सुमारे २२६ हेक्टर वरील जमीन खरडून गेली असून २१५ घरांमध्ये पाणी शिरले आहे. या भागातील जनावरे वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत.
तहसीलदारांना पंचनाम्याच्या सूचना
चोवीस तासांमध्ये ज्या महसूल मंडलात ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्या मंडलातील शेती पिकांच्या व इतर नुकसानीचे पंचनामा करण्यासाठी संबंधित तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेती पिकाच्या नुकसानीबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्याकडून सविस्तर अहवाल येणार आहे. हा अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष झालेले नुकसान व अर्थसाहयाची रक्कम मागणी याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्तांना सविस्तर माहिती सादर केली जाणार आहे.
जिल्ह्यातील १४ मंडलांना फटका
बार्शी तालुक्यातील बार्शी महसूल मंडलात ६७.८, माढा तालुक्यातील रोपळे मंडलात १२६.३, टेंभुर्णी मंडळात ९०.५, मोडनिंब मंडल ६५.३ रांझणी मंडलात ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. करमाळा तालुक्यातील अर्जुन नगर मंडलामध्ये ८१.५, केम मंडलात १२९.३, सालसे मंडळात ८६.५, पंढरपूर तालुक्यातील करकंब मंडलात ८६.३, पटवर्धन कुरोली मंडल ६७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १३१.८ मिलीमीटर पावसाची नोंद सांगोला तालुक्यातील हातीद मंडलात झाली आहे. सोनंद मंडलात ८९, कोळा मंडलात ८४.०३ आणि माळशिरस तालुक्यातील लवंग मंडलात ७८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.