प्रमिला चोरगी
सोलापूर : सोलापूर विमानतळ (Solapur Airport) आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) चिमणीचा वाद चांगलाच पेटला आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा संचालक धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) यांना ‘आरोपी’ संबोधल्याप्रकरणी विकास मंचचे केतन शहा (Ketan Shah) आणि काडादी यांच्यात शनिवारी (ता. २६ नोव्हेंबर) सायंकाळी बाचाबाची झाली. या वेळी काडादी यांनी केतन शहा यांना ‘तू जर माझ्याबरोबर वैयक्तिक जास्त शहाणपणा केलास तर गोळ्याच घालतो तुला,’ असे म्हणत खिशातील रिव्हॉल्वर काढून दाखवले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Dharmaraj Kadadi showed revolver to Ketan Shah)
होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी, या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर गेल्या २१ दिवसांपासून चक्री उपोषण सुरू आहे. या विषयावर विकास मंचच्या सदस्यांनी महापालिकेच्या नूतन आयुक्त शीतल तेली-उगले यांची भेट घेतली होती. तेव्हा ‘श्री सिद्धेश्वर मंदिरात आपण फोटो का काढलात, ते आरोपी आहेत’ असे केतन शहा आयुक्तांना म्हणाले होते. आयुक्त तेली-उगले यांनी विकास मंचच्या या वक्तव्यावर, ‘आपण विषय दुसरीकडे भरकटत नेत आहात, मुद्द्यावर बोला. कदाचित आपली ही शेवटची भेट ठरेल’, असे म्हणाल्या होत्या.
केतन शहा यांच्या ‘आरोपी’ या शब्दावर भडकलेल्या धर्मराज काडादी यांनी शनिवारी सायंकाळी उपोषणस्थळ गाठत शहा यांना विचारणा करत सज्जड दम दिला. यावेळी त्यांच्यात झालेला वादाचा व काडादी यांनी शहा यांना रिवॉल्व्हर दाखवत ‘गोळ्या घालेन’ म्हटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यावेळी काडादी यांनी केतन शहा यांना, ‘मॅडमबरोबर पेपरमध्ये कोण होतं? मी एवढंच सांगतो तुला, तू जर माझ्याबरोबर वैयक्तिक जास्त शहाणपणा केलास तर गोळ्या घालतो तुला,’ असे म्हणत काडादी यांनी खिशातील रिवॉल्व्हर काढून दाखवले. यावर केतन शहा म्हणाले, ‘गोळ्या घाला तुम्ही, हरकत नाही; पूर्ण अधिकार आहे तुम्हाला. तुमच्याकडे बंदुकीचं लायन्सस आहे, तुम्ही गोळ्या घालू शकता.’ त्यावर भडकलेले काडादी म्हणाले, ‘अरे वेडा आहे का, किती सहन करायचं. मूर्ख आहे का. मला दोन मिनिटं वेळ लागत नाही. वेळ तशी आणलास तर तसंही करतो,’ असं म्हणत धमकी दिली.
दरम्यान, या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करणारा केतन शहा यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, असे सांगितले. यासंदर्भात काडादी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही.
काडादींनी गोळ्या घालण्याची धमकी दिली
गेल्या २१ दिवसांपासून विमानसेवेसाठी उपोषण सुरू आहे. शनिवारी सायंकाळी उपोषण संपल्यानंतर विकास मंचचे सदस्य गप्पा मारत उभारलो होतो. तेवढ्यात धर्मराज काडादी तेथे आले अन् थेट अरेरावी सुरू केली. त्यांनी मला गोळ्या घालण्याची धमकी दिली. मी म्हटलं, आपल्याकडे रिवॉल्व्हरचा परवाना आहे. त्यावर त्यांनी ‘काय बोलतो रे’ म्हणत खिशातून रिवॉल्व्हर काढले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याविषयी विचारविनिमय सुरू आहे, असे सोलापूर विकास मंच सदस्य केतन शहा यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.