सोलापूर : राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas aghadi) सरकार कोसळल्यानंतरही ‘एमआयएम’च्या (Aimim) माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रवेशाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) शुक्रवारी रात्री सोलापुरात आले आणि शनिवारी सकाळी सोलापुरातून सांगलीला गेले. तौफिक शेख थेट पक्षात आले, माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) व माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kote) यांनी जुळे सोलापुरातील ठेंगील वाड्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेत चर्चा केली. प्रदेशाध्यक्षांच्या संपूर्ण दौऱ्यात माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे हे मात्र नॉट रिचेबल राहिले. माने आणि कोठे यांचे तूर्तास ‘वेट’ करुन नंतरच राष्ट्रवादीचे वॉच हाती बांधण्यासंदर्भात ठरल्याचे समजते. (Dilip Mane, Mahesh Kothe in the role of 'wait and watch' about NCP entry)
एमआयएमचे माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी तौफिक शेख यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला दांडी मारली, त्यांच्या गैरहजेरीची चर्चा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जाहीर सभेत केल्याने ते धावत-पळत येत हेरिटेजमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालिन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून विकास निधीसाठी इंदापूरमार्गे बारामतीला जाणारे दिलीप माने, महेश कोठे, तौफिक शेख, आनंद चंदनशिवे यांच्या मनात सध्या नक्की काय सुरू आहे? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.
तौफिक शेख व त्यांच्या सोबतच्या माजी नगरसेवकांनी यांनी थेट प्रवेश करत आपले राजकीय पत्ते ओपन केले. माजी आमदार माने आणि माजी महापौर कोठे यांनी जाहीर कार्यक्रमाऐवजी सदिच्छा भेट घेऊन आम्ही तुमच्या सोबतच असल्याचा मेसेज दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यात चंदनशिवे मात्र कुठेच दिसले नाहीत. हैदराबादला गेलेले माजी महापौर कोठे रात्री उशिरा प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला आल्याने ‘यांचे झाले, त्यांचे केंव्हा?' याची उत्सुकता मात्र कायम राहिली आहे.
कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार : चंदनशिवे
माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले, या दौऱ्याबाबत मला काहीही कल्पना नव्हती, तसेच जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने मी तिकडे गेलो होतो. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात असलेल्या माझ्या अटींची माहिती मी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. त्यावर अद्यापपर्यंत काहीच निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत मी माझ्या कार्यकर्त्यांशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे.
काडादींचा राष्ट्रवादीला सॉफ्ट कॉर्नर
सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या कारखान्याला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांमध्ये राष्ट्रवादीने मोलाची मदत केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, तत्कालिन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी काडादी यांना वेळोवेळी मदत केल्याने गेल्या काही वर्षांपासून काडादी यांचा राष्ट्रवादीबद्दल सॉफ्ट कॉर्नर झाला असल्याचे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यात ग्रामदैवत सिध्दरामेश्वरांच्या दर्शनानिमित्त प्रदेशाध्यक्ष पाटील व काडादी यांची भेट झाली.
राष्ट्रवादीचे स्ट्रॉंग सोशल इंजिनिअरिंग
सोलापूर शहर राष्ट्रवादी पूर्वी मराठा नेतृत्वाभोवतीच अधिक फिरताना दिसत होती. त्यामुळे त्यांचे चांगले रिझल्ट मिळाले नाहीत. धर्मराज काडादी, महेश कोठे, ॲड. यू. एन. बेरिया, तौफिक शेख, सुधीर खरटमल, प्रमोद गायकवाड, आनंद चंदनशिवे, नलिनी चंदेले या नेत्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने सोलापूर शहरात स्ट्रॉंग सोशल इंनिनिअरिंगचा फॉर्म्युला आखल्याचे दिसत आहे.
नव्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्षांचे बुस्ट
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूर दौऱ्यात नव्या कार्यकर्त्यांना बूस्ट देण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्रीचे जेवण सुधीर खरटमल यांच्याकडे (ठेंगील वाडा) त्यांनी केले. शनिवारी सकाळी राष्ट्रवादी महिलाच्या अध्यक्षा सुनीता रोटे, युवकचे पदाधिकारी प्रशांत बाबर, विद्यार्थीचे पदाधिकारी सुहास कदम यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. प्रदेशाध्यक्षांच्या या भेटीमुळे नव्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.